

सांगली : महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी ४० फायरमन आणि १० चालक कंत्राटी पद्धतीने पुरवठा करण्याच्या निविदेचा विषय स्थायी समितीने मंगळवारी प्रलंबित ठेवला. संबंधित एजन्सीला ठेका देण्यापूर्वी शासनाचे नियम, निकष, अटी-शर्ती तसेच कंत्राटी भरतीबाबतचे शासन निर्णय व निर्देश व संबंधित एजन्सीच्या यापूर्वीच्या कामाचा सविस्तर अहवाल पुढील स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश सभापती अतुल माने यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान श्री गणेशाच्या आगमनापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्ते पॅचवर्कच्या ६.५० कोटींच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच कामांना सुरुवात होईल, असेही सभापती माने यांनी सांगितले.
महापालिकेत मंगळवारी स्थायी समिती सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील तसेच स्थायी समिती सदस्य अभिजित भोसले, मयूर पाटील, मोहन वाटवे, स्वाती शिंदे, बबिता मेंढे, स्मिता यमगर, दीपाली पाटील, पद्मश्री पाटील, मालुश्री खोत, किर्ती देशमुख, शिरीन पिरजादे उपस्थित होते.
फायरमन, चालक पुरवठ्यासाठी एकच निविदा आली आहे. निविदाधारक एजन्सीने यापूर्वी कोणत्या ठिकाणी काम केले आहे, सध्या कोणत्या ठिकाणी कंत्राटी मनुष्यबळ पुरवत आहे, त्या कामाबाबत काही तक्रारी आहेत का, याचीही माहिती स्थायी समितीने मागविली आहे. संबंधित एजन्सीकडे महापालिकेच्या घंटागाड्यांसाठी चालक पुरवठ्याचा ठेका होता. चालकांसाठी महापालिकेने संबंधित एजन्सीला पेमेंट केले आहे. मात्र, एजन्सीने घंटागाडी चालकांना त्यांच्या वेतनाची संपूर्ण रक्कम दिली आहे की नाही, याची माहिती दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश सभापती माने यांनी अधिकाऱ्यांना दिले. कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबत महापालिकेच्या निधीचा गैरवापर किंवा कामगारांची आर्थिक अडवणूक होऊ नये, यासाठी याबाबत स्पष्टता करण्याचे निर्देश देण्यात आले.
'डीएलपी'तील रस्त्यांचे पॅचवर्क ठेकेदाराच्या पैशातून
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या विषयावर चर्चा झाली. यापूर्वी पॅचवर्कसाठी एक कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. आता आणखी सुमारे साडेपाच कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. आठवडाभरात कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह विस्तारित भागातील रस्त्यांवरील आवश्यक पॅचवर्क तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश माने यांनी दिले. दोष दुरुस्ती कालावधीत (डीएलपी) असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती महापालिकेच्या निधीतून करू नये, तर संबंधित ठेकेदाराच्या खर्चातूनच करून घ्यावी, असे स्पष्ट निर्देशही सभापती माने यांनी दिले.
१७९ भूखंडावर लवकरच महापालिकेचे नाव
कुपवाड हद्दीतील मंजूर रेखांकनातील १७९ खुले भूखंड, अंतर्गत रस्ते यांना महापालिकेचे नाव लावण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. हरकतींसाठी नोटीस प्रसिद्ध केलेली आहे. या नोटीसवर नागरिकांनी दहा दिवसांत हरकती नोंदवायच्या आहेत. यापूर्वी सांगली व मिरजेतील मंजूर रेखांकनातील खुले भूखंड महापालिकेच्या नावावर लावण्याची कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कुपवाडमधील १७९ भूखंडांना महापालिकेचे नाव लावण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती सभापती माने यांनी दिली.
एन-कॅप निधीतून गॅस दाहिनी, डस्ट कंट्रोल सिस्टीम
राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम अर्थात एन-कॅपअंतर्गत शिल्लक निधीतून मिरजेतील पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत गॅस दाहिनी तसेच सांगलीतील अमरधाम येथे डस्ट कंट्रोल सिस्टीम बसविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी आवश्यक प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अशी माहिती माने यांनी दिली.