

सांगली : राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबररोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल 229 पैकी 129 हरकती पूर्णत: मान्य, 32 हरकती अंशत: मान्य, तर 68 हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 8 मध्ये समाविष्ट केलेले कुपवाडचे गावठाण परत प्रभाग क्रमांक 2 (कुपवाड) ला जोडले आहे, तर प्रभाग 2 मधील मेघजीभाईवाडी, गुलमोहोर कॉलनी ते पार्श्वनाथनगर हा भाग प्रभाग 8 मध्ये समाविष्ट केला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील मगदूम मळा, नवनाथनगर हा परिसर मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये समाविष्ट केला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना दि. 3 सप्टेंबररोजी प्रसिद्ध झाली होती. काही बदल वगळता 2018 च्या निवडणुकीचीच प्रभाग रचना 2025 च्या निवडणुकीसाठी करण्यात आली होती. या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना, हरकती मागवल्या होत्या. त्यावर 229 सूचना, हरकती दाखल झाल्या होत्या. मिरज-पंढरपूर रोडवरील मगदूम मळा, नवनाथनगर हा परिसर प्रभाग क्रमांक 2 मधून वगळून मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 ला जोडावा, यासाठी तब्बल 117 हरकती दाखल झाल्या होत्या. प्रारूप रचनेत प्रभाग क्रमांक 8 मध्ये समाविष्ट केलेला कुपवाड गावठाणचा भाग हा 2018 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 मध्ये समाविष्ट करावा, अशा मागणीच्या हरकतीही मोठ्या प्रमाणावर होत्या.
प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल सूचना, हरकतींवर सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध झाली. महापालिकेचे मुख्यालय तसेच प्रभाग समितींची चारही कार्यालये आणि संकेतस्थळावर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली. प्रभागांची व्याप्ती, प्रभागाच्या सीमा आणि नकाशे प्रसिद्ध करण्यात आले. एकूण 20 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये अंतिम रचनेत बदल झाले आहेत. उर्वरित 17 प्रभागांची रचना जैसे थे आहे. प्रभाग क्रमांक 2 ची व्याप्ती आता कुपवाड गावठाण, शांत कॉलनी, बजरंगनगर, शरदनगर, ओंकार कॉलनी, हनुमाननगर, स्वामी मळा, दुर्गानगर, शिवशक्तीनगर, विद्या-सागर कॉलनी, मिरज-पंढरपूर रोड पश्चिम बाजू अशी आहे. प्रभाग क्रमांक 3 ची व्याप्ती मिशन हॉस्पिटल, अल्फोन्सा स्कूल, मिरज औद्योगिक वसाहत, संजयनगर वसाहत, तासगाव वेस वसाहत, लक्ष्मीनगर, कमानवेस, मगदूम मळा, नवनाथ नगर, तर प्रभाग क्रमांक 8 ची व्याप्ती मेघजीभाईवाडी, सेवासदन-सिनर्जी हॉस्पिटल, गुलमोहोर कॉलनी, विजयनगर विकास कॉलनी, विलिंग्डन कॉलेज, चिंतामण कॉलेज, वॉनलेस चेस्ट हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, विनायकनगर, विकास कॉलनी, गंगानगर, अष्टविनायकनगर, क्रांतिसिंह नाना पाटील सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, अजंठा कॉलनी, एमएसईबी ऑफिस, मनपा विभागीय कार्यालय नवीन इमारत कुपवाड अशी झाली आहे.