सांगली : आता गाजणार महापालिका निवडणुकीचा आखाडा
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात अधिसूचित करण्याचे आणि चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या अधिसूचनेकडे लक्ष लागले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची नगरसेवक संख्या 78 वरून 85 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवक संख्या, प्रभाग संख्या, प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे. एकूणच लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुकीचा आखाडा गाजणार आहे.
सांगली महानगरपालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाल 19 ऑगस्ट 2023 रोजी संपला. तेव्हापासून महापालिकेत प्रशासकराज आहे. विधानसभेची निवडणूक झाली. राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळाले. आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल, अशी अटकळ होती. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होणार, याकडेही लक्ष लागले होते. अखेर 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य शासनाला स्पष्ट निर्देश दिले. चार आठवड्यात निवडणुकांची अधिसूचना काढणे आणि चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
लोकसंख्या वाढली, नगरसेवक वाढणार..!
महापालिकेचे 20 प्रभाग आणि 78 नगरसेवक संख्या आहे. दर दहा वर्षांनी जनगणना होत असते. 2021 मध्ये जनगणना झाली नाही. मात्र वाढलेल्या लोकसंख्येला प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी ऑगस्ट 2022 मध्ये शासनाने नगरसेवक संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला होता. त्यानुसार 3 लाखापेक्षा अधिक व 6 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेत निवडून येणार्या नगरसेवकांची संख्या किमान 65, तर कमाल 85 इतकी असेल. तीन लाखापेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 15 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त नगरसेवकाची तरतूद करण्यात येईल, अशी सुधारणा करण्यात आली होती.
दरम्यान, 2011 च्या लोकसंख्येनुसार सांगली महापालिकेची लोकसंख्या 5 लाख 2 हजार 793 आहे. तीन लाखावर प्रत्येक 15 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त नगरसेवकाची तरतूद होणार. त्यानुसार अतिरिक्त नगरसेवकांची संख्या 13.51 होती. महापालिकेत सध्या निवडून येणारी नगरसेवक संख्या 78 आहे. नवीन सुधारणा व सदस्य (नगरसेवक) संख्येची कमाल मर्यादा पाहता महापालिका नगरसेवकांची संख्या 85 होईल, असे संकेत मिळत आहेत. मात्र त्याबाबत अधिकृत शासन अधिसूचना काय निघेल, याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महायुती विरुध्द महाविकास आघाडी, असा आखाडा रंगणार, हे स्पष्ट आहे.

