

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल आणि डिझेलच्या वापरात काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेचे नगरसेवक दुचाकीवरून महापालिकेत येणार असल्याची चर्चा आहे. आता पदाधिकाऱ्यांनीही मोटारीऐवजी दुचाकीवरून महापालिकेत जावे. मुख्यमंत्र्यांचा आदर्श घ्यावा, असे म्हटले जात आहे.
ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुचाकीवरून मंत्रालयात जाऊन इंधन बचतीचा संदेश दिला. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, नगरसेवक यांनीही इंधन बचतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी चर्चा सुरू झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी अधिकृत चारचाकी वाहनांचा वापर कमी करून दुचाकीवरून महापालिकेत यावे, महापालिकेचे वाहन जमा करून त्यांचा वापर मर्यादित करावा, असेही चर्चेत म्हटले जात आहे. ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी स्वतः उदाहरण घालून दिल्यास नागरिकांमध्येही इंधन बचतीबाबत सकारात्मक संदेश जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत अधिकृत निर्णय झालेला नसला, तरी या विषयाची चर्चा रंगली आहे.