Sangli News : पदाधिकाऱ्यांची कोटी-कोटींची उड्डाणे; नगरसेवक लाखात

अर्थसंकल्पातील तरतुदीवरून नाराजी : पंक्चर, बुके खरेदीवरील तरतुदीपेक्षा नगरसेवकांना निधी कमी
Sangli Municipal Corporation |
Sangli Municipal Corporation |File Photo
Published on
Updated on

सांगली : महापालिकेच्या अर्थसंकल्पात पदाधिकाऱ्यांसाठी कोटी-कोटींची तरतूद, मात्र नगरसेवकांना प्रत्येकी केवळ 4.71 लाख रुपये तरतूद आहे. यावरून महासभेत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहनांची टायर पंक्चर काढण्याची तरतूद, बुके खरेदी तरतुदीपेक्षाही नगरसेवकांची तरतूद कमी आहे. प्रत्येक नगरसेवकाला 50 लाख रुपये विकास निधीची तरतूद करावी, अशी मागणी महापौरांकडे केली.

महापालिकेची तहकूब अर्थसंकल्पीय महासभा बुधवारी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नगरसचिव सहदेव कावडे उपस्थित होते.

महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, गटनेत्यांसाठी कोटीच्या निधीची तरतूद केली आहे, मात्र नगरसेवकांना अवघे 4.71 लाख रुपये का, असा सवाल बिलकिस बुजरूक यांनी केला. प्रभागात विकास करण्यासाठी नगरसेवकांना प्रत्येकी 4.71 लाख रुपयांची तरतूद आहे. महापौरांनी अर्थसंकल्प अंतिम करताना नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करावी, अशी मागणी केली. दयानंद खोत म्हणाले, नगरसेवकाला केवळ 4.71 लाखांचा स्थानिक विकास निधी आहे. यापेक्षा एखाद्या गावच्या सरपंचांना अधिक निधी मिळतो. अभिजित कोळी यांनीही नगरसेवकांचा स्थानिक विकास निधी वाढवून देण्याची मागणी केली.

युवराज बावडेकर यांनी गटनेत्यांच्या निधीत दुजाभाव केल्याचा आरोप केला. मैनुद्दीन बागवान यांनीही नगरसेवकांच्या निधीत वाढ करण्याची मागणी केली. दरम्यान, नगरसेवकांच्या सूचना, मागण्यांचा विचार केला जाईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. पदाधिकारी मालक झाले काय?; केवळ पदाधिकाऱ्यांवर निधीची खैरात केली आहे. दीड-दोन कोटी ते चार-साडेचार कोटीची तरतूद केली आहे. केवळ तेच मालक झाले आहेत काय? नगरसेवकांचा विचार न करता केवळ पदाधिकाऱ्यांसाठी मोठी तरतूद कशी केली जाते?, असा सवाल विष्णू माने यांनी केला.

विरोधी पक्षनेतेपदाचा अवमान : चव्हाण

विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण म्हणाले, महापौरांनंतर विरोधी पक्षनेतेपदाला दर्जा असताना अर्थसंकल्पात दुजाभाव का? महापौरांना साडेचार कोटी, स्थायी सभापतींना चार कोटी, उपमहापौरांना 2 कोटी आणि मग विरोधी पक्षनेत्याला 1.50 कोटी विकास निधी का? विरोधी पक्षनेता, सदस्यांचा विकास निधी वाढवावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news