

कुपवाड : कुपवाड-विजयनगर रस्त्यावरील चाणक्य चौकातील अतिक्रमणे केलेली 36 खोकी, हातगाडे, स्टॉल महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख नागार्जुन मद्रासी यांनी दिली.
कुपवाड शहर प्रभाग समिती तीन नगररचना विभागाचे प्रमुख शहाबाज शेख यांनी कुपवाड ते विजयनगर रस्त्यावरील चाणक्य चौकातील सर्वच अतिक्रमण केलेल्या खोकीधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. आपण केलेले अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे अन्यथा महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या माध्यमातून सदरची खोकी हटविली जातील, असा इशारा नोटिसीमध्ये दिलेला होता. नगररचना विभागाने दिलेल्या मुदतीत संबंधितांनी अतिक्रमणे काढली नसल्याने गुरुवारी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने 36 अतिक्रमणे हटविली.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख नागार्जुन मद्रासी यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुपवाड शहर प्रभाग समिती तीनचे सहायक आयुक्त सचिन सागावकर, आरोग्य विभागाचे सिध्दांत ठोकळे यांनी या मोहिमेत भाग घेतला होता.