Sangli News : ८० कोटींचा कचरा; ऑडिटने उकरून काढले प्रश्न

निविदेतील अटींपासून ठेकेदाराच्या पात्रतेपर्यंत सवाल; महापालिकेला खुल्या स्पर्धेचा लाभ न मिळाल्याचा ठपका
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal Corporation
Published on
Updated on

उध्दव पाटील

सांगली : महापालिकेच्या समडोळी रोड तसेच मिरज-बेडग रोड कचरा डेपोतील जुन्या साचलेल्या कचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे या दोन स्वतंत्र कामांसाठी एकूण ७९.५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. या दोन्ही कामांच्या निविदा प्रक्रियेवर लेखापरीक्षण अहवालात ताशेरे मारले आहेत. विशिष्ट कंपनीलाच काम मिळावे, अशा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविल्याचे दिसून येते, असा गंभीर आक्षेप लेखापरीक्षणात नोंदवला आहे. दैनंदिन कचऱ्यावरील प्रक्रियेच्या कामात निविदा प्रक्रिया, एकच निविदाधारक, दर, तांत्रिक गुणांकन यावर आक्षेप घेतला असून कामगार विमा कमी कपातीबद्दल १०.६० लाख रुपये वसूलपात्र ठरवले आहेत. जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंग कामात ठेकेदाराची पात्रता व निविदा अटींच्या पालनावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कामगार विमा व सेसचे कमी कपात केलेले ४१.८८ लाख रुपये वसूलपात्र ठरवले आहेत.

समडोळी रोड आणि मिरज-बेडग रोड कचरा डेपोतील जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगसाठी ३६ कोटी १३ लाख १३ हजार ६६७ रुपये, तर दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाटीसाठी ४३ कोटी ३६ लाख ६० हजार २६९ रुपये, असा एकूण ७९.५० कोटींचा खर्च होता. या प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ६० कोटी २ लाख ७५ हजार २६९ रुपयांची मान्यता असल्याचे लेखापरीक्षणात नमूद आहे. मात्र वाढीव १९ कोटी ४६ लाख ९८ हजार ६६७ रुपयांच्या खर्चासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कागदपत्रे लेखापरीक्षणास सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे ही रक्कम आक्षेपाधीन ठरविण्यात आली.

एकच निविदाधारक; प्रक्रियेचे दर अवास्तव

कचरा डेपोवर येणाऱ्या दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ४३.३६ कोटींच्या कामाच्या निविदेतील अटी व शर्ती अत्यंत क्लिष्ट आणि विशिष्ट स्वरूपाच्या असल्याने त्या एखाद्या विशिष्ट निविदाधारकाला पात्र करण्याच्यादृष्टीने तयार केल्या असाव्यात, असे लेखापरीक्षणाचे निरीक्षण आहे. परिणामी महापालिकेला स्पर्धात्मक दराचा लाभ मिळाला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकमेव निविदाधारकाचा आर्थिक लखोटा उघडला असता, प्रति मेट्रिक टन ७७२ रुपये दर प्राप्त झाला. त्यानंतर वाटाघाटी करून तो ७२० रुपये प्रति मेट्रिक टन करण्यात आला. जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगसाठी ४१९ रुपये प्रति टन, तर दैनंदिन कचरा प्रक्रियेसाठी ७२० रुपये प्रति टन दर निश्चित करण्यात आला. हे दर अवास्तव असल्याचेही लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे.

३६ कोटींच्या कामाच्या पात्रतेवरच आक्षेप

२०२२-२३ मधील जुन्या साठवलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या बायोमायनिंग कामाची निविदा ३६.१३ कोटींची आहे. समडोळी व मिरज-बेडग रोड कचरा डेपोतील अंदाजे ८ लाख ४२ हजार २२३ घनमीटर जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्याचे नियोजन होते. ४२९ रुपये क्युबिक मीटरप्रमाणे ३६.१३ कोटी रुपये खर्च अंदाजित केला होता. या निविदेत 'कृष्णा ग्रीन' आणि 'झिग्मा ग्लोबल' सहभागी झाल्याची नोंद आहे.

कृष्णा ग्रीन ही भागीदारी संस्था असून तिच्या तांत्रिक व आर्थिक पात्रतेसाठी 'भूमी ग्रीन'ची कागदपत्रे सादर करण्यात आली. कृष्णा ग्रीन ही भूमी ग्रीनची एसपीव्ही असल्याचे दाखविण्यासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करण्यात आल्याचे लेखापरीक्षणात नमूद आहे. मात्र निविदेच्या अटी, शर्तीत 'एसपीव्ही'चा समावेश नसल्याचा लेखापरीक्षणाचा आक्षेप आहे. 'कृष्णा ग्रीन'ला 'भूमी ग्रीन'च्या पात्रतेच्या आधारे पात्र ठरवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 'कृष्णा ग्रीन'ला घनकचरा व्यवस्थापन कामाचा कोणताही पूर्वअनुभव, वित्तीय पात्रता, भागभांडवल दिसून येत नाही, तरीदेखील सुमारे ३६ कोटींचे काम दिल्याचे दिसून येते, असा आक्षेप लेखा परीक्षणात नोंदविण्यात आला आहे. (क्रमशः)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news