

सांगली : येथील शामरावनगर परिसरातील मुस्लिम दफनभूमीच्या भूसंपादन प्रकरणात २४ कोटी रुपयांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केला आहे. महापालिकेने मूळ जागामालकांना दिलेली भरपाईची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वर्ग झाली असून, या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मिरजेतील जागेच्या तडजोडीच्या ठरावावरून निर्माण झालेल्या वादात महापौर सूर्यवंशी यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, या भूसंपादनाबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने चुकीची माहिती दिली. भूसंपादनाची सुरुवातीची रक्कम ६ कोटी रुपये होती, ती नंतर १० कोटी झाली आणि प्रत्यक्षात तब्बल २४ कोटी रुपये खर्ची पडले आहेत.
भूसंपादनाची ही रक्कम महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाकडे वर्ग केली व तिथून ती जागामालकांच्या खात्यावर वर्ग झाली. मात्र, जमीन मालकांकडून काही काँग्रेस नगरसेवकांनी ही रक्कम घेतली असून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावे ती हस्तांतरित केल्याची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकरणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, काँग्रेसचे नगरसेवक मयूर पाटील आणि माजी नगरसेवक तौफिक शिकलगार यांचे बँक खात्यांतील आर्थिक व्यवहार तपासावेत, अशी मागणीही महापौर सूर्यवंशी यांनी केली आहे.