

सांगली : महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित हॉकर्स झोन, नो-हॉकर्स झोनची यादी चारही प्रभाग समितींच्या सहायक आयुक्तांकडून सोमवारी फेरीवाला समिती बैठकीत सादर झाली. प्रस्तावित नो-हॉकर्स झोन 65 आहेत. महापालिका प्रशासन व फेरीवाला समितीतील फेरीवाला प्रतिनिधींकडून झोनची पाहणी होणार आहे. त्यानंतर हॉकर्स व नो-हॉकर्स झोन निश्चित होणार आहेत. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील रहदारीचे रस्ते, फूटपाथ मोकळे केले जाणार आहेत. फेरीवाल्यांचे योग्य जागी टप्प्या-टप्प्याने पुनर्वसन करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सोमवारी फेरीवाला समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहायक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, अनिस मुल्ला तसेच नगररचनाकार निर्मला देवकाते, फेरीवाला समिती सदस्य सुरेश टेंगले, रेखा पाटील, सादिक बागवान, निखिल सावंत, लता दुधाळ, अमित मोतुगडे, बेबी मुल्ला, मालदार मीर तौफिक, मुजीर जांभळीकर उपस्थित होते.
फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. फेरीवाल्यांची खुल्या जागेत किंवा प्रशासनाच्यावतीने व्यवस्था करण्यात येत आहे. सहायक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला यांनी हॉकर्स, नो-हॉकर्स झोनबाबत माहिती दिली. महापालिका क्षेत्रात 3 हजार 839 फेरीवाले आहेत. रहदारीच्या रस्त्यांवर व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांची योग्य ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रहदारीचे रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीची कोंडी होणार नाही.या झोनची माहिती समितीपुढे न ठेवताच ते निश्चित कसे काय केले, असा प्रश्न समिती सदस्य सुरेश टेंगले व काही सदस्यांनी केला. दरम्यान, पुनर्वसन करण्यात येणार्या ठिकाणांबाबतही समितीसदस्य पाहणी करून प्रशासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अंतिम निर्णय होईल. फेरीवाला समितीची पुढील बैठक 3 जुलै रोजी होणार आहे.
आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित हॉकर्स झोन, नो-हॉकर्स झोन हे फेरीवाला समितीपुढे सादर केले आहेत. प्रशासन व फेरीवाला समिती सदस्य यांच्या संयुक्त पाहणीनंतर दि. 3 जुलै रोजी हॉकर्स झोन, नो-हॉकर्स झोन निश्चित होतील. नो-हॉकर्स झोनमध्ये फेरीवाल्यांना मज्जाव राहील. त्याची कडक अंमलबजावणी होईल.