

सांगली : गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा लागून राहिलेली पर्यावरणपूरक ई-शिवाई (इलेक्ट्रिक) बस अखेर शनिवारी सांगली बस स्थानकाच्या ताफ्यात दाखल झाली. पहिल्या टप्प्यात अशा चार बसेस आल्या असून, सोमवारपासून त्या प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत. अंदाजे सव्वादोन कोटी रुपये किंमत असलेली ही 45 आसनी वातानुकूलित बस अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षेच्यादृष्टीने परिपूर्ण आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर आदी शहरांच्या तुलनेत सांगलीत आलेल्या या बसेसमध्ये अधिक प्रगत सुविधा आहेत.
सांगली जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस कालबाह्य व भंगार अवस्थेत पोहोचल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. आता या अत्याधुनिक बसेस आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांगली, ईश्वरपूर आणि मिरज या तीनही आगारांसाठी प्रत्येकी 40 अशा एकूण 120 ई-शिवाई बसेस मंजूर झाल्या आहेत.
सध्या चंदनवाडी येथील कार्यशाळेत दाखल झालेल्या या चार बसेसची तांत्रिक तपासणी सुरू आहे. या बसेस खासगी तत्त्वावरील असून, एसटी महामंडळ त्या भाडेतत्त्वावर चालवणार आहे. यामध्ये चालक खासगी कंपनीचा, तर वाहक एसटी महामंडळाचा असेल. या बसेसच्या लोकार्पणप्रसंगी विभाग नियंत्रक सुनील भोकरे, यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, सचिन शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
ईश्वरपुरात पहिले चार्जिंग स्टेशन
पर्यावरणपूरक प्रवासावर भर देण्यासाठी या इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येत आहेत. यासाठी मंजूर झालेल्या चार्जिंग स्टेशनपैकी ईश्वरपूर येथील ई-स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल. माधवनगर आणि मिरज येथील स्टेशनसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. तोपर्यंत प्राथमिक टप्प्यात या बसेस पुणे आणि पंढरपूर येथे चार्ज केल्या जातील. सांगली वगळता इतर जिल्ह्यांत या बसेस सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या आहेत.