

आटपाडी : आटपाडी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना शासकीय यंत्रणा मात्र अद्यापही सुस्त असल्याचे दुष्काळ आढावा बैठकीत उघड झाले. टँकर मंजुरीतील दिरंगाई, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे, दूषित पाणीपुरवठा, चारा टंचाई आणि पशुवैद्यकीय विभागाच्या मनमानी कारभारावर नागरिकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. यामुळे संतप्त झालेल्या खासदार विशाल पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. "दुष्काळाचे गांभीर्य ओळखा, नागरिकांना वेठीस धरू नका; अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा," असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर सर्वाधिक नाराजी व्यक्त झाली. पिंपरी खुर्द, देशमुखवाडी, झरे, आवळाई, बोंबेवाडी, मासाळवाडी, आंबेवाडी आदी गावांतून टँकरची मागणी होऊनही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात दिरंगाई होत असल्याचे समोर आले. यावर आमदार बाबर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून मागणीनुसार टँकर मंजूर करण्याची मागणी केली. ज्या दिवशी टँकरची मागणी येईल, त्याच दिवशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
जलजीवन मिशनची कामे पूर्ण झाल्याचा केवळ कागदोपत्री देखावा न करता प्रत्यक्ष चाचणी, टेस्टिंग रिपोर्ट आणि तपासणी अहवालानंतरच योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. दिघंची आणि शेटफळे येथील दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींवरही तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
चारा टंचाईमुळे पशुधनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दीड महिन्यापूर्वीच चारा संपल्याची माहिती असतानाही प्रशासनाने ठोस व्यवस्था केली नसल्याचा आरोप काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी केला. यावर मोठ्या जनावरांसह शेळ्या-मेंढ्यांचेही सर्वेक्षण करून चाऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. चारा डेपो आणि छावण्यांसाठी तहसील कार्यालयाकडे ३६ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार शीतल बंडगर यांनी दिली.
पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्यास संबंधित शेतकऱ्यांना प्रतिदिन एक हजार रुपये मोबदला देण्याचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले. हिवतडमधील सात ते आठ बंधारे टेंभूच्या पाण्याने भरून देण्याची मागणी सरपंच आनंदराव देशमुख यांनी केली.
पशुवैद्यकीय अधिकारी उपचारासाठी अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या आणि वेळेवर सेवा देत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. महावितरण, पाटबंधारे आणि कृषी विभागाच्या कारभारावरही आक्षेप घेण्यात आले. अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि कामातील दिरंगाईवर खासदार व आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा, अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला.
या बैठकीस जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, पंचायत समिती सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती कल्पना पुसावळे, प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार शीतल बंडगर, गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, जिल्हा परिषद सदस्य विनायक मासाळ, जयदीप भोसले, बाजार समिती सभापती संतोष पुजारी, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.