

तासगाव : कुमठे (ता. तासगाव) येथे मुलाचे दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने काही वेळातच आईचाही दुर्दैवी अंत झाला. मंगळवारी सकाळी अवघ्या पाच तासात माय-लेकाच्या झालेल्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत होती. अविनाश महादेव पाटील (वय 54) आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील (75) अशी त्यांची नावे आहेत.
कुमठे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अविनाश पाटील आपल्या कुटुंबासह राहत होते. एक नामवंत पैलवान अशी त्यांची ओळख होती. तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहून कुस्तीकडे वळावी, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराशी झुंजत होते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. सकाळी साडेसात वाजता नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाश यांच्या मृत्यूचा आघात सहन न झाल्याने त्यांची आई सुधाताई पाटील यांना मोठा धक्का बसला. मुलाच्या अंत्यविधीनंतर अवघ्या काही वेळातच सकाळी साडेअकरा वाजता त्यांचीही प्राणज्योत मालवली.
अविनाश यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले नातेवाईक आपल्या घराकडे परतत असतानाच त्यांना सुधाताई यांच्या निधनाची बातमी कळाली. अवघ्या पाच तासाच्या अंतराने माय-लेकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. पाटील कुटुंबावर नियतीने क्रूर सूड उगवल्याची भावना व्यक्त होत आहे. अविनाश यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि सुना असा परिवार आहे.