Sangli Drowning Incident: तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

मणेराजुरीतील घटना
Sangli Drowning Incident
Sangli Drowning Incident
Published on
Updated on

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे तलावात पाय घसरून पडून माय- लेकीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेने मजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबावर काळाने डाव साधला. पुसेसावळी (ता. खटाव) येथील कुटुंब मोलमजुरीसाठी मणेराजुरी येथे नुकतेच आले होते.

सत्वाला संतोष जाधव (वय २८) व मंजू संतोष जाधव (वय १०, दोघी रा. मूळ पुसेसावळी ता. खटाव, सध्या रा. मणेराजुरी) असे माय-लेकीची नावे आहेत. सत्वाला या पती संतोष याच्यासह मंजू व अंजू, अविनाश, रोहित या चार मुलांसह मोलमजुरी करण्यासाठी एक महिन्यापूर्वी मणेराजुरी येथे आले होते.

बुधवारी दुपारी सत्वाला या आपल्या चारी मुलांना घेऊन चिमणखोरा पाझर तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. सत्वाला या धुणे धूत असताना मंजू ही अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरली. तिचा पाय घसरून ती खोल पाण्यात बुडू लागली. मंजूला वाचविण्यासाठी सत्वाला या पाण्यात उतरल्या.

दोघी पाण्यात बुडल्याचे काठावर असणाऱ्या अंजू हिच्या लक्ष्यात येताच तिने आरडाओरड केला. तिने मोबाईलवरून वडील संतोष यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वडील व स्थानिक नागरिक घटनास्थळी येईपर्यंत उशीर झाला होता. तोपर्यंत दोघीही बुडून मृत झाल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसपाटील दीपक तेली यांना दिली. तेली यांनी तासगाव पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिस निरीक्षक विशाल टकले हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news