

उद्धव पाटील
सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकीचे तसेच महापालिकेच्या मालकीचे अनेक खुले भूखंड आहेत. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे या भूखंडांकडे दुर्लक्ष झाल्याने ते झाडे-झुडपे, काटेरी वनस्पती, गवत, कचरा, सांडपाणी आणि मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून राहते, काही ठिकाणी गटारीचे पाणी थांबते. परिणामी डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. ही परिस्थिती केवळ सार्वजनिक आरोग्यापुरती मर्यादित न राहता, शहराला बकालपणा आणणारी आहे. अस्वच्छ भूखंडधारकांवर दंडात्मक कारवाईचे पाऊल आयुक्त सत्यम गांधी यांनी उचलले आहे. त्याची व्याप्ती वाढण्याबरोबरच महापालिकेने स्वत:च्या मालकीचे भूखंड स्वच्छ करून विकसित करणेही तितकेच गरजेचे आहे.
महापालिका क्षेत्रात पंचवीस हजारावर खासगी खुले भूखंड आहेत. महापालिकेच्या मालकीचे खुले भूखंड साडेआठशे ते नऊशे आहेत. यातील काही भूखंड सोडले, तर बहुतांश खुले भूखंड हे अस्वच्छतेचे आगर बनलेले आहेत. झाडे-झुडपे, काटेरी वनस्पती वाढलेली आहे. गवत वाढलेले आहे. प्लास्टिक पिशव्या, कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यात गाढव, कुत्र्यांचा सुखनैव संचार राहतो आहे. पावसाळ्यात या भूखंडांमध्ये पाणी साचून राहते. डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. अनेक खुल्या भूखंडांमध्ये सांडपाणी साचल्याचे दिसून येते. शहराचा कोणताही भाग याला अपवाद ठरताना दिसत नाही. विस्तारित भागात ही समस्या अधिक आहे. पंचशीलनगर, काकानगर, कर्नाळ रस्ता, हरिपूर रस्ता, शामरावनगर परिसर, हनुमाननगर, दत्तनगर, विजयनगर परिसर, वसंतनगर, शालिनीनगर, साखर कारखान्याची मागील बाजू यांसह शहरातील अनेक खुले भूखंड शहराचा बकालपणा वाढवत आहेत. जुन्या, पडक्या इमारतीही त्यात भर टाकत आहेत. स्वच्छ, सुंदर शहर संकल्पनेला यामुळे तडा जात आहे.
मालकांना दंड; स्वागतच, पण..!
शहरातील अस्वच्छ खुल्या भूखंडांची संपूर्ण जबाबदारी संबंधित मालकांचीच असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. संभाव्य दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तातडीने आपल्या खुल्या प्लॉटमधील कचरा, काटेरी झाडे आणि झुडपे काढून स्वच्छता करावी, असे आवाहन महापालिकेने केलेले आहे. खुल्या भूखंडात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, अस्वच्छता होऊ न देणे आणि परिसर सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक मालकाची सामाजिक जबाबदारी आहे.
वारंवार सूचना देऊनही जर भूखंड स्वच्छ ठेवले गेले नाहीत, तर महानगरपालिका स्वतः त्या भूखंडांची स्वच्छता करणार आहे. मात्र, ही स्वच्छता मोफत नसेल. त्यासाठी लागणारा संपूर्ण प्रशासकीय खर्च आणि दंडाची रक्कम थेट भूखंडधारकांच्या घरपट्टी बिलामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. ही केवळ सुरुवात असून, यापुढे ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. महापालिकेच्या या पवित्र्याचे स्वागतच आहे. पवित्रा खासच आहे, पण याचबरोबर महापालिकेच्या मालकीचे खुले भूखंडही प्राधान्याने स्वच्छ झाले पाहिजेत, विकसित झाले पाहिजेत. महापालिका खासगी खुले भूखंड स्वच्छ करत राहील, दंडाची रक्कम घरपट्टीच्या बिलात समाविष्ट होत राहील. पण ती वसूल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा थकबाकीची रक्कमच वाढत जाण्याची शक्यता आहे.
...तर बाग-बगीचे, मैदाने, विरंगुळ्याची ठिकाणे बनतील
अस्वच्छ व दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या खुल्या भूखंडांमध्ये महापालिका मालकीच्याही अनेक खुल्या भूखंडांचा समावेश आहे. खरे तर असे भूखंड हे केवळ समस्या ठरत नसून, योग्य नियोजन आणि विकास केल्यास ते शहरासाठी मोठी संधी ठरू शकतात. अस्वच्छ असलेले, झाडेझुडपे, गवत वाढलेले हेच खुले भूखंड विकसित केल्यास शहरात जागोजागी बाग-बगीचे, हिरवळी, मुलांसाठी खेळाची मैदाने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे तसेच चालण्यासाठी व व्यायामासाठी मोकळी जागा निर्माण करता येऊ शकते.
आज जे भूखंड डासांची पैदास, नशेखोरांचे अड्डे आणि अस्वच्छतेचे केंद्र बनले आहेत, तेच उद्या नागरिकांसाठी शुद्ध हवा, आरोग्य आणि सुरक्षिततेचे केंद्र होऊ शकतात. अशा विकसित भूखंडांवर बसण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, व्यायामाची उपकरणे यांसारख्या मूलभूत सुविधा उभारता येतील. यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि शहराच्या सौंदर्यातही भर पडेल.