

सांगली : महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीच्या नोटिसा वाटप करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी सुमारे 6 हजार नोटिसांचे वाटप झाले आहे. शुक्रवारी 6 हजार, शनिवारी 20 हजार नोटिसांचे वाटप होईल. एकूण 2 लाख 8 हजार मालमत्ताधारकांना नोटिसांचे वाटप होणार आहे. या नोटिसांवर हरकत घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत आहे, अशी माहिती सहायक आयुक्तआकाश डोईफोडे यांनी दिली.
महापालिका क्षेत्रात करयोग्य मूल्यावर/भाडेमूल्यावर आधारित घरपट्टी आकारली जात होती. आता भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीची पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील 2 लाख 8 हजार मालमत्ताधारकांना घरपट्टी मागणी बिलाच्या नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. सहा हजार मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये सांगलीतील 83 भागांपैकी खणभाग, एसएफसी मॉल, शामरावनगर, सांगली-मिरज रोड या चार भागात नोटीस वाटप केले आहे. मिरजेतील 43 पैकी 2 आणि कुपवाडमधील 29 पैकी 2 भागात नोटिसा वाटप केले आहे. 2 लाख 8 हजार नोटिसा वाटपाचे काम पूर्ण होईपर्यंत दररोज हे काम सुरू असणार आहे.
महापालिका क्षेत्रात दि. 1 जानेवारी 2026 पासूनच्या नवीन निवासी व व्यापारी मालमत्तांना भांडवली मूल्यावर आधारित कराची आकारणी सुरू करण्यात आली आहे. मात्र जुन्या मालमत्तांना आकारणी करण्यासाठी प्रशासनाने पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक, व्यापारी व अन्य संघटना तसेच पालकमंत्री, खासदार आमदार यांच्याशी चर्चा केली. या सर्वांना नवीन कर रचनेची माहिती देण्यात आली. या कररचनेत नागरिकांवर कराचा फारसा बोजा पडणार नाही. भाड्याने दिलेल्या इमारतींची घरपट्टी कमी होणार आहे. नोटिसा मिळताच मालमत्ताधारकांनी त्यावर हरकती असतील प्रभाग समिती कार्यालयात संपर्क साधून अर्ज करावा.