

उध्दव पाटील : सांगली
प्रभाग क्रमांक 16 हा केवळ भौगोलिक घटक नाही, तर तो सांगलीच्या राजकीय संस्कृतीचा आरसा आहे. खणभाग, नळभाग या पूर्वापार ओळखीपासून ते आजच्या निवडणूक रणधुमाळीपर्यंत हा प्रभाग सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अलीकडील निवडणुकांमध्ये जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाची धार वाढत आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महापौर घडवणारा हा प्रभाग. ही निवडणूक म्हणजे केवळ उमेदवारांची नव्हे, तर विचारसरणी, समाजघटकांची कसोटी ठरत आहे.
खणभाग, नळभाग, हिराबाग वॉटर वर्क्स, राजवाडा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, संजोग कॉलनी, बदाम चौक, हिंदू-मुस्लिम चौक, फौजदार गल्ली (अंशत:), राजवाडा परिसर असा हा प्रभाग आहे. पूर्वेला काँग्रेस कमिटी ते सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत आणि स्टँड रोडची उत्तर बाजू, सुभाष चौक, बापट बालमंदिर, महापालिका आणि पूर्वेला काँग्रेस कमिटी या चौकोनातील दाट लोकवस्तीचा भाग सध्याचा प्रभाग क्रमांक 16 होय. या प्रभागाला प्रामुख्याने नळभाग, खणभाग आणि राजवाडा परिसर या नावाने ओळखले जाते.
प्रामुख्याने खणभाग, नळभाग परिसराने तत्कालीन सांगली नगरपालिकेला अनेक नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात धोंडिराम थोरात हे नगराध्यक्ष होते. ते नळभागातील. स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये सांगली नगरपालिकेची निवडणूक झाली. गुलाबराव पाटील हे या वॉर्डातून निवडून गेले आणि नगराध्यक्ष झाले. या भागातून निवडून गेलेले राजाभाऊ जगदाळे दोनदा नगराध्यक्ष झाले. मारुतीराव मोहिते, डी. के. पाटील, अजीज शिकलगार, सलीम शेख, रामभाऊ घोडके यांसारख्या नेत्यांनी या प्रभागाला केवळ प्रतिनिधित्वच दिले नाही, तर नगरपालिकेच्या सत्ताकेंद्रात स्थान मिळवून दिले. त्यामुळेच हा भाग नेतृत्व निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो. अर्थात हा भाग काँग्रेसच्या प्रभावाचा होता.
महानगरपालिका स्थापनेनंतरचे बदलते गणित
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची स्थापना 9 फेब्रुवारी 1998 रोजी झाली. स्थापनेनंतर सहा महिन्यांत महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. सध्याच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये समाविष्ट असलेला भाग म्हणजे खणभाग, नळभाग तसेच राजवाडा परिसर, पंचमुखी मारुती रस्त्याची दक्षिण बाजू, जयभवानी रस्ता परिसर व संलग्न भाग. सामाजिकदृष्ट्या मिश्र प्रभाग.
महापालिकेच्या 1998 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत या सर्व भागातून महापालिकेत पाच नगरसेवक निवडणूक द्यायचे होते. 1998 च्या निवडणुकीत या भागातून अरुण मोरे (शिवसेना), बालाजी काटकर (अपक्ष), रामभाऊ घोडके (वसंतदादा स्वाभिमानी आघाडी), राजेश नाईक (काँग्रेस), हारुण शिकलगार (काँग्रेस) हे विजयी झाले होते. महापालिकेच्या 2003 च्या निवडणुकीत चारसदस्यीय प्रभाग रचना होती. सध्याचा प्रभाग आणि त्यावेळचा प्रभाग पाहता, सध्याचा भाग आणि लगतच्या अन्य काही भागातून त्यावेळी सात नगरसेवक निवडून गेले होते. संजय बजाज (राष्ट्रवादी), बालाजी काटकर (अपक्ष), अनुराधा मोडक (भाजप), ॲड. स्वाती शिंदे (शिवसेना), रामभाऊ घोडके (राष्ट्रवादी), राजेश नाईक (राष्ट्रवादी), श्रीमती वाघे (अपक्ष) हे वेगवेगळ्या पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेसचे नेते मदन पाटील हे त्यावेळी राष्ट्रवादीत होते.
महापालिकेच्या 2003, 2008, 2013 आणि 2018 च्या निवडणुकीत प्रभाग रचना बदलत गेली. 2008 च्या निवडणुकीत मनीषा उत्तम साखळकर, राजेश नाईक, श्रीमती बावा हे काँग्रेसचे उमेदवार, तसेच काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या उमेदवार शहनाज शिकलगार विजयी झाल्या. 2018 च्या अटीतटीच्या निवडणुकीत या प्रभागातील 2 जागा काँग्रेसने, तर 2 जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसचे उत्तम साखळकर आणि माजी महापौर हारुण शिकलगार हे विजयी झाले, तर भाजपच्या स्वाती शिंदे व सुनंदा राऊत विजयी झाल्या.
निवडणुका होत गेल्या, तसे राजकीय वर्चस्वही बदलत गेले. काही निवडणुकांत काँग्रेसला स्पष्ट लाभ मिळाला, तर काहीवेळा राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षांनी बाजी मारली. आता 2026 च्या निवडणुकीत भाजपकडून माजी नगरसेवक उत्तम साखळकर, माजी नगरसेविका स्वाती शिंदे, विद्या दानोळे, प्रदीप बन्ने, तर काँग्रेसकडून मयूर पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, सलमा शिकलगार, दीप्ती घोडके हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.