

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची बहुप्रतीक्षित शिक्षण समिती अखेर स्थापन झाली. मात्र ती आता वादात अडकली आहे. या समितीत भाजपच्या ९, तर राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांचा समावेश आहे. काँग्रेसने दिलेल्या ५ सदस्यांचा समावेश या समितीत झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसमधून संतापाचा सूर व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आले आहे. त्यामुळे नवीन कार्यकारिणीच्या अनुषंगाने शिक्षण समिती स्थापन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. त्यानुसार २७ मार्च २०२६ रोजीच्या महासभेच्या ठरावाद्वारे समितीची रचना निश्चित करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद आयुक्त संजीता महापात्र यांच्याकडे आहे. या समितीत भाजपच्या पद्मश्री पाटील, विद्या नलवडे, उज्वला कांबळे, मालुश्री खोत, प्राजक्ता धोत्रे, दीपक वायचंडे, लक्ष्मण नवलाई, रोहिणी पाटील, योगिता राठोड, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे दिग्विजय सूर्यवंशी, शैला दुर्वे, रेश्मा चौधरी आणि नसिमा नाईक यांचा समावेश आहे. प्रशासन अधिकारी (शिक्षण विभाग) हे समितीचे सचिव आहेत.
विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण म्हणाले, महापालिकेतील पक्षनिहाय संख्याबळानुसार समितीत सदस्यत्व मिळावे, अशी मागणी केली होती. काँग्रेसचे १८ व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एक सदस्य हे संख्याबळ गृहीत धरून शिक्षण समितीसाठी ५ नगरसेवकांची नावे दिली होती. मात्र शिक्षण समिती सदस्यांच्या यादीत काँग्रेस सदस्यांचा समावेश दिसत नाही. हा प्रकार चुकीचा आहे. शिक्षण समितीत समावेशासाठी ५ नगरसेवकांनी नावे पुन्हा दिलेली आहेत.