

सांगली : महापालिकेच्या सात समित्यांच्या सभापती पदांवर शुक्रवार, दि. 13 मार्च रोजी शिक्कामोर्तब होणार आहे. स्थायी, समाजकल्याण तसेच प्रभाग समिती क्रमांक 3 च्या सभापती पदांसाठी भाजप उमेदवारांविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा शुक्रवारी विशेष सभेत होईल.
महिला व बालकल्याण समिती तसेच प्रभाग समिती क्रमांक 1, 2 आणि 4 या चार समित्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) युतीचे बहुमत आहे. त्यामुळे सातही समित्यांचे सभापती युतीचे होणार हे स्पष्ट आहे. स्थायी समिती सभापतिपदी अतुल माने, समाजकल्याण समिती सभापतिपदी गीता पवार व प्रभाग समिती क्रमांक 3 च्या सभापतिपदी माया गडदे यांच्या बिनविरोध निवडीच्या घोषणेची आता केवळ औपचारिकता बाकी उरली आहे.
निवडणूक की बिनविरोध..!
महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी भाजपच्या बानू जमादार यांच्याविरोधात काँग्रेसच्या अंजली जाधव यांचा उमेदवारी अर्ज आहे. प्रभाग समिती क्रमांक 1 च्या सभापती पदासाठी भाजपच्या रईसा शिकलगार यांच्याविरोधात काँग्रेसच्या अश्विनी कोळेकर, प्रभाग समिती क्रमांक 2 च्या सभापती पदासाठी भाजपच्या वैशाली गवळी यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोनल पाटील-सावर्डेकर आणि प्रभाग समिती क्रमांक 4 च्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या अश्विनी कोळी यांच्याविरोधात काँग्रेसच्या बिलकिस बुजरूक यांचा उमेदवारी अर्ज आहे.