Sangli News : कब्जेपट्टीसाठी 120 भूखंडांबाबत दोन दिवसात हरकती

स्थायी समिती सभा; हनुमाननगर येथे 4 एकर जागेत होणार क्रीडांगण
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on
Updated on

सांगली : शहरातील 120 खुल्या भूखंडांच्या कब्जेपट्टीसाठी दोन दिवसात सूचना, हरकती मागवण्यात येत आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी दिली. दरम्यान, शहरातील हनुमाननगर येथील चार एकर खुल्या जागेत क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी आरक्षित जागेची पाहणी करून सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच अधिकारी, खातेप्रमुख व सदस्य उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील मंजूर रेखांकनातील 380 भूखंडांवर महापालिकेचे नाव लावण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे प्रस्ताव दिलेले आहेत. मात्र कब्जेपट्टी नसल्याने महापालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही थांबलेली आहे. या जागांच्या कब्जेपट्टीसाठी आयुक्तांनी जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचे आदेश दिले होते. यावर स्थायीत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात सांगली शहरातील 120 भूखंडांबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती दोन दिवसात मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर हरकती निकालात काढून महापालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही होणार आहे.

सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांत नव्याने स्वतंत्र क्रीडांगण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. हनुमाननगर येथील 15 एकर खुली जागा आहे. यापैकी काही जागेत भाजी मंडई, अग्निशमन केंद्र, स्केटिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. उर्वरित साडेतीन ते चार एकर जागेत क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे. या जागेवर स्पोर्ट्‌‍स कॉम्प्लेक्स व प्ले-ग्राऊंडचे आरक्षण आहे. या जागेची अधिकाऱ्यांनी पाहणी करून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. कुपवाड शहरात देखील प्ले-ग्राऊंडचे आरक्षण असलेली जागा शोधावी, अशा सूचना देखील सभापती माने यांनी दिली.

सन 2025-26 मधील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या 2 कोटी 89 लाखांच्या 9 कामांसाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानअंतर्गत महापालिकेला 5 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शाळा दुरुस्ती, स्वच्छतागृह बांधणे, शाळा परिसर सुधारणे आदी कामे करण्यात येणार आहेत. याला धोरणात्मक मान्यता देण्याचा विषय महासभेला पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news