

सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथे नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर कमरेला पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला सांगली स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. शिवम अर्जुन शिंगारे (वय 19, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 61 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, इनाम धामणी हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर एक व्यक्ती कमरेला पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांना मिळाली. त्यानुसार निरीक्षक संजीव झाडे यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले. उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने इनाम धामणी येथे सापळा रचला. यावेळी नागपूर ते रत्नागिरी महामार्गावरील अंकली सेवा रस्त्यावर शिवम शिंगारे हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे पिस्तूल व काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याला अटक करून पिस्तूल जप्त केले. अधिक चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल गजानन खामकर याच्याकडून दोन वर्षांपूर्वी खरेदी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.