Miraj Crime| बेळंकीत कौटुंबिक वादातून साडूचा खून

दांडक्याने जीवघेणा हल्ला : संशयित पसार; तपासासाठी पथके रवाना
Crime News
Crime News
Published on: 
Updated on: 

मिरज : बेळंकी (ता. मिरज) येथे कौटुंबिक कारणातून झालेल्या वादातून साडूनेच साडूच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला. ही थरारक घटना शुक्रवार, दि. १३ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. महेशकुमार गौतम ब्रिजलाल (वय ३५, रा. बैरवी, उत्तर प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पसार झालेल्या संशयित साडूच्या शोधासाठी मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेशकुमार ब्रिजलाल व त्याचा साडू बबलू (पूर्ण नाव समजू शकले नाही.) हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून, सध्या बेळंकी येथील लिमये मळा परिसरात शेतमजूर म्हणून काम करत होते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास महेशकुमार आणि त्यांचा साडू बबलू यांच्यामध्ये कोणत्यातरी कौटुंबिक कारणावरून जोरदार बाचाबाची व वादावादी झाली. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यादरम्यान रागाच्या भरामध्ये बबलू याने लाकडी दांडक्याने महेशकुमार यांच्या डोक्यात हल्ला केला.

या जीवघेण्या हल्ल्यात महेशकुमार हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्याचे पाहून बबलू याने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मिरज प्रांताचे पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित पाटील यांच्यासह पोलिस फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला आहे.

खून करून पसार झालेल्या संशयित बबलू याचा शोध घेण्यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची (एलसीबी) विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. प्रथमदर्शनी हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले असले, तरी नेमक्या कोणत्या कारणातून हा प्रकार घडला याचा उलगडा संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.