Miraj Crime| खुनानंतर संशयित साडूने गळफास घेऊन संपविले जीवन

बेळंकीमधील धक्कादायक प्रकार ; पैशाच्या देवाण-घेवाणीतून घटना ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Miraj Crime News
Miraj Crime News
Published on: 
Updated on: 

मिरज :मिरज तालुक्यातील बेळंकी येथे पैशांच्या वादातून झालेल्या खुनानंतर संशयित साडूनेही झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी आरतीदेवी महेशकुमार गौतम यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेशकुमार ब्रिजलाल गौतम (वय ४१, मूळ रा. बैरवी, उत्तर प्रदेश; सध्या रा. बेळंकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर बबलू भगवती (रा. उत्तर प्रदेश) असे जीवन संपविलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे. याशिवाय दिनेश आणि मूलचंद अशी अन्य दोन संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत महेशकुमार गौतम आणि बबलू भगवती हे दोघेही सख्खे साडू आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील असून मिरज तालुक्यातील बेळंकीमध्ये शेतमजुरीचे काम करीत होते. दिवाळीनंतर महेशकुमार हा उत्तर प्रदेश येथे गावी जाणार होता; त्यामुळे तो बबलू याच्याकडे कामाच्या पैशाचा हिशेब मागत होता. यातून दोघांमध्ये शुक्रवारी वादावादी झाली.

त्यानंतर शुक्रवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास महेशकुमार हा घरामध्ये जेवण करीत असताना, बबलू, दिनेश आणि मूलचंद यांच्यासह तेथे आला. रागाच्या भरात त्याने घरासमोरील चुलीजवळ जळणासाठी ठेवलेल्या लाकडी दांडक्याने महेशकुमारच्या डोक्यात पाठीमागून जोरदार फटका मारला. एका फटक्यात महेशकुमार जमिनीवर कोसळला. वर्मी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी महेशकुमारची पत्नी आरतीदेवी हिने बबलूस अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, संशयित दिनेश आणि मूलचंद यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महेशकुमार हा बेशुद्ध पडल्यानंतर बबलूसह सर्व संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले आणि परिसरातील शेतातच लपून राहिले. रात्री उशिरा, हल्ल्यात महेशकुमारचा मृत्यू झाल्याचे तसेच पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे लक्षात येताच, संशयित बबलू यानेही घरापासून जवळच असलेल्या शेतामधील एका झाडाला गळफास घेतला. रात्रभर पोलिस पथक परिसरात त्याचा शोध घेत होते. मात्र, सकाळी त्याने झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

महेशकुमार आणि बबलू या दोघांच्या मृतदेहांची मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर मिरजेतच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, महेशकुमारच्या खूनप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात बबलूसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बबलूच्या मृत्यूप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेशकुमारचा मृत्यू झाल्याचे समजताच बबलूचा गळफास

महेशकुमारवर लाकडी दांडक्याने हल्ला करून बबलूने पलायन केले होते. दरम्यान, तो घराजवळच असलेल्या शेतामध्ये लपून बसला होता. परंतु, महेशकुमारचा मृत्यू झाल्याचे तसेच पोलिस आपला शोध घेत असल्याचे समजताच घाबरलेल्या बबलूने शेतामधील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.