

कवठेमहांकाळ : अल्पवयीन मुलीला इशारे करून छेडणाऱ्या ‘मजनू’ला मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी पकडून बेदम चोप दिला. जवळच्या सलूनमध्ये नेऊन त्याचे मुंडण केले. कवठेमहांकाळ शहरापासून काही किलोमीटरवर असलेल्या एका मोठ्या गावात ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठेमहांकाळच्या उत्तरेकडील एका मोठ्या गावातील मुख्य पेठेतील किराणा दुकानात जवळच्या गावातील तरुण कामास होता. काही दिवसांपासून त्याने दुकानाजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीकडे हातवारे करून इशारे करत छेडछाड चालविली होती. मुलीने ही बाब घरी सांगताच नातेवाईकांनी दुकानदाराला सूचना देऊन संबंधित तरुणाला कामावरून काढून टाकण्यास सांगितले. त्यानंतर गावात येण्यास मज्जावही केला होता. तरीही तो वारंवार गावात येऊन मुलीला इशारे करायचा यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.
बुधवारी सकाळी तो गावात येताच नातेवाईकांनी त्याला पकडले. त्याला बेदम चोप दिला. जवळच्या सलूनमध्ये नेऊन त्याचे मुंडण केले आणि पुन्हा प्रसाद दिला. पोलिसांना संबंधित मुलगा आणि मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या आईने तक्रार देण्यास नकार दिला. तरुण आणि त्याच्या नातेवाईकांनीही तक्रार दाखल केली नाही.