

विटा : "सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्षाची वाढ रोखण्याचा किंवा कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न कोणी केल्यास, त्यांना देण्यासाठी माझ्याकडे चांगले 'इंजेक्शन' आहे," अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपला थेट इशारा दिला आहे. विटा येथील कार्यालयात आयोजित शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत मंत्री सामंत बोलत होते.
यावेळी आमदार सुहास बाबर, क्रीडा सेना प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभूते, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आटपाडीचे तानाजीराव पाटील, बजरंग पाटील आदी उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले, मी स्वतः महायुतीच्या समन्वय समितीचे सदस्य आहे. महायुती ही समन्वयाने चालली पाहिजे, कोणत्याही मतदार संघात प्रशासकीय यंत्रणेवर दबाव टाकून किंवा पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करून शिवसेनेच्या कामात अडथळे आणणे योग्य नाही. राजकारण हे खिलाडूवृत्तीने आणि जनहितासाठी असावे. आमदार सुहास बाबर यांचे काम १०० नव्हे तर १७० टक्के आहे.
मात्र, स्थानिक पातळीवर भाजपच्या काही मंडळींकडून सुहास बाबर आणि तानाजीराव पाटील यांची अडवणूक होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार मी स्वतः आमदार सुहास बाबर, तानाजीराव पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या अधिवेशनात भेट घेणार आहे. काही जमिनीचे प्रश्न असले तरी, मी दिलेला शब्द १०० टक्के नाही तर १००१ टक्के पाळणार आणि आटपाडीत एमआयडीसी करूनच दाखवणार, तसेच, मतदारसंघातील नळ पाणी योजनेच्या कामासाठी आपण आधी च आदेश दिले आहेत.