

मिरज : वेदांत बंडगर खून प्रकरणातील मोक्कातून जामीन मिळाल्यानंतर पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या म्हमद्या नदाफ (४०, रा. संजयनगर, सांगली) या सराईत गुंडासह त्याचा साथीदार मंगेश श्रीमंत कांबळे (३५, रा. अभयनगर, सांगली) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, आठ काडतुसे जप्त केली. मिरज ते अर्जुनवाड रस्त्यावर कृष्णाघाट येथे बुधवार, दि. २५ रोजी ही कारवाई केली. मिरज पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे, मिरज शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विक्रम पाटील आणि मिरज वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक रणजित तिप्पे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. उपअधीक्षक अजय कोकाटे व सहायक निरीक्षक विक्रम पाटील, रणजित तिप्पे यांचे पथक नाकाबंदी करत असताना अर्जुनवाडमार्गे मिरजकडे एक कार वेगाने येत असल्याचे दिसले.
मिरज वाहतूक शाखेकडे नेमणूक असलेल्या दोन अंमलदारांनी कार रोखली. कारमध्ये म्हमद्या व त्याचा साथीदार असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांनी कारकडे धाव घेतली. त्यांनी म्हमद्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला मागील बाजूस पिस्तूल आढळून आले. त्यानंतर साथीदार मंगेश याची झडती घेतली असता त्याच्याकडेही गोळ्यांनी भरलेली पिस्तूल मिळून आली. दोघांकडून आठ गोळ्यांनी भरलेली दोन पिस्तुले जप्त केली. पुढील तपासासाठी दोघांना महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.
म्हमद्याने पिस्तुले कशासाठी आणली होती, याचा पोलिस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात त्याने एक पिस्तूल स्वसंरक्षणासाठी व दुसरे पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे; मात्र याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. त्याच्या निशाणावर कोणी होते का किंवा घातपाताचा कट होता का, याचीही पडताळणी पोलिस करत आहेत.
दरम्यान, वेदांत बंडगर खून प्रकरणातील मोकातून जामीन मिळाल्यानंतर म्हमद्या नदाफ याला सांगली जिल्ह्यात प्रवेशबंदी होती. केवळ आठवड्यातून एकदा मिरज पोलिस उपअधीक्षकांकडे हजेरी लावण्यासाठी जिल्ह्यात येण्याची त्याला परवानगी होती. मंगळवार, दि. २४ रोजी तो उपअधीक्षक कोकाटे यांच्याकडे हजेरीसाठी आला होता. कोणत्याही कारणाशिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास तसेच शस्त्र बाळगण्यास त्याला मनाई असताना दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडे दोन पिस्तुले सापडल्याने खळबळ उडाली आहे.