Sangli News: म्हैसाळमधील वर्गखोल्या खासगी संस्थेच्या ताब्यात

उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्या पाहणीत माहिती समोर : चौकशीचे आदेश; कारवाईचे संकेत
Sangli ZP
Sangli ZPPudhari
Published on
Updated on

सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे सात ते आठ वर्गखोल्या खासगी संस्थेला वापरण्यासाठी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्या अचानक पाहणीत उघडकीस आला. याबाबत अधिकृत करार झाला आहे का, संबंधित संस्थेकडून भाडे आकारले जाते का, तसेच वर्गखोल्या वापरण्यास परवानगी कुणी दिली, याची माहिती मागविल्यानंतरही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे लाड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

उपाध्यक्ष लाड यांनी मिरज तालुक्यातील भोसे, म्हैसाळ, सोनी आणि तानंग गावांतील जिल्हा परिषद शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्या. यावेळी म्हैसाळ येथील शाळेतील वर्गखोल्या खासगी संस्थेच्या वापरात असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांना जाब विचारला. मात्र भाडे करार झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली.

परंतु, संबंधितांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती गोळा करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भोसे, सोनी आणि तानंग येथील काही शाळांमध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासल्यानंतर अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने शिक्षकांच्या अध्यापनाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील व्यवस्थापनाबाबतही त्रुटी आढळून आल्याने संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लोकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा मिळालीच पाहिजे. कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्यास राहून नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्या, अशा सूचनाही उपाध्यक्ष लाड यांनी संबंधितांना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news