Sangli Water Scarcity| ‘म्हैसाळ’, ‘ताकारी’ आजपासून सुरू

​कालवा समितीच्या नियोजनानुसार आवर्तन; २८ टीएमसी पाण्याचे नियोजन
Takari project
देवराष्ट्रे : ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने मुख्य कालवा पाण्याने भरून वाहत आहे. (छाया ः विठ्ठल भोसले) (File Photo)
Published on: 
Updated on: 

​सांगली : जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेत म्हैसाळ आणि ताकारी या दोन्ही उपसा सिंचन योजना आज - रविवार, दि. १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. रब्बी हंगामाचे आवर्तन नेहमीच्या फेब्रुवारी महिन्याऐवजी यंदा लवकर सुरू करण्यात येत असल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता वाढली असून, पूर्व भागातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाळू लागली आहेत, तर अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाणी योजना तातडीने सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी कालवा समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने १५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामाचे आवर्तन सुरू करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार दोन्ही योजना कार्यान्वित होत आहे.

कालवा समितीच्या बैठकीत सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून २८ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मंत्री विखे-पाटील यांच्या आदेशानंतर कोयना धरणातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग अखंडपणे सुरू ठेवण्यात आल्याने कृष्णा नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याशिवाय म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आणि जत तालुक्यातील दुष्काळी भागातील तलाव भरून पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी वारणा धरणातून ९५० क्युसेक विसर्ग सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाने वारणा धरण व्यवस्थापनाकडे केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १५ दिवस जत तालुक्याला प्राधान्याने पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानंतर उर्वरित तालुक्यांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.