

कोकरुड : मेणी (ता. शिराळा) येथे सोमवारी मध्यरात्री लागलेल्या अचानक आगीत किराणा मालाच्या दुकानासह घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेणी येथील महादेव यशवंत पाटील यांचे कुटुंब लक्ष्मीपूजन व जेवण आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास झोपी गेले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास घरातील बाबुराव पाटील यांना खोलीत प्रचंड धूर जाणवले. त्यांनी तातडीने कुटुंबातील सदस्यांना उठवून घराबाहेर काढले व शेजाऱ्यांना मदतीसाठी हाका मारल्या. ग्रामस्थांनी विहिरी आणि बोअरच्या पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते.
सुमारे चार तासांच्या अग्नीतांडवात घरातील किराणा मालाचे दुकान, मळणी करून ठेवलेले भात, भुईमूग व मक्याचे दाणे जळून खाक झाले. याशिवाय घरातील कपडे, संसारोपयोगी साहित्य, शेती अवजारे, रोख रक्कम आणि छताचे लाकडी बांधकाम पूर्णपणे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर तलाठी विलास कारंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.