

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौरपद पुन्हा खुले (सर्वसाधारण) झाले आहे. त्यामुळे महापौर पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे. माजी उपमहापौर व स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी, माजी सभापती निरंजन आवटी, भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अतुल माने तसेच नगरसेविका रोहिणी पाटील, ॲड. स्वाती शिंदे, लक्ष्मण नवलाई हे महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच भाजपचे नेते व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार असून महापौर व अन्य पदाधिकारी निवडीच्या हालचालींना गती येणार आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदांच्या आरक्षणासाठी गुरुवारी मंत्रालयात सोडत काढण्यात आली. सांगलीचे महापौर पद आरक्षित होणार की पुन्हा खुले राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अनेकांच्या नजरा मंत्रालयातील सोडतीकडे लागल्या होत्या. अखेर सांगलीचे महापौर पद खुले राहिले आणि उत्सुकता संपली. पण त्याचबरोबर आता महापौर कोण होणार, याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.
महापालिकेत भाजपला 39 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे बहुमत अवघ्या एका जागेने हुकले आहे. मात्र भाजपने शिवसेनेशी बोलणी केली आहेत. महापौर, उपमहापौर पदासाठी भाजपकडे बहुमत आले असले तरी, ते काठावरचे आहे. शिवाय स्थायी समितीतील बहुमतासाठी भाजपला राष्ट्रवादीची गरज भासणार आहे. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर आता महापौर पदाची निवडणूक रंगणार, हे स्पष्ट आहे.
महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत भाजपने 41 जागांसह व दोन अपक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताने सत्ता मिळवली होती. पहिली अडीच वर्षे भाजपचे दोन महापौर झाले. मात्र अडीच वर्षांच्या दुसऱ्या टर्ममध्ये महापौर, उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भाजपची सहा मते फुटली. त्यामुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र भाजपने त्यांना स्थायी समितीचे सभापतिपद दिले. आता पुन्हा महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी हे प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत. भाजपमधून निरंजन आवटी हेही महापौरपदासाठी प्रबळ इच्छुक आहेत.
सुरेश आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी यांनी महापालिकेत सभापती पद मिळवले, पण महापौर पदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. आता निरंजन आवटी महापौर पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अतुल माने हेही महापौर पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. ते आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी त्यांचे नाव पुढे आले आहे.
भाजपकडून महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेविका रोहिणी पाटील यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे बंधू भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. सासर आणि माहेरकडून मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. ॲड. स्वाती शिंदे या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्या हिंदुत्वाच्या कट्टर पुरस्कर्त्या म्हणून ओळखल्या जातात. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. त्यांना महापालिकेत यापूर्वी कोणतेही पद मिळालेले नाही, त्यामुळे त्या आता प्रबळ इच्छुक आहेत. लक्ष्मण नवलाई हेही महापौर पदाच्या शर्यतीत आहेत. ते अनुभवी नगरसेवक आहेत.