

सांगली ः बेदाणा प्रोसिसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एचडीएफसी बँकेला एक कोटी 98 लाख रुपयांचा गंडा घालून पसार झालेला मुख्य सूत्रधार मुकुंद हणमंत जाधवर (वय 35, मूळ रा. वालवड, ता. बार्शी) याला नवी मुंबईतील बेलापूर येथून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वखालील पथकाने केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुख्य संशयित मुकुंद हणमंत जाधवर याच्यासह त्याच्या नात्यातील सातजणांवर डिसेंबर महिन्यात विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एचडीएफसी बँकेचे सहउपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी फिर्याद दिली होती. संशयित सातजणांनी डिस्ट्रीक्ट अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी उभारली होती. या कंपनीमार्फत बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकिंग प्रकल्प उभारण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेद्वारे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. बँकेने प्रकल्प उभारणासाठी एक कोटी 98 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. कर्जाची रक्कम तीन व्हेंडर कंपन्यांच्या नावावर वर्ग करण्यात आली. प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधन होते, पण संशयिताने बँकेकडे तारण दिलेल्या जमिनीवर प्रकल्प उभारणार असल्याचे सांगितले होते, पण प्रत्यक्षात प्रकल्पच उभा केला नाही. ही बाब बँकेच्या निदर्शनास आली. कंपनीच्या नावावर कर्ज घेऊन बँकेला एक कोटी 98 लाख रुपयांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली. अखेर बँकेच्यावतीने विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच संशयित मुकुंद जाधवर याच्यासह संशयित पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथक नियुक्त केले. या पथकाला जाधवर हा नवी मुंबईतील बेलापूर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिस कॉन्टेबल इरफान पखाली, विष्णू गावडे, प्रेरणा नाईक यांच्या पथकाने नवी मुंबई गाठत संशयित जाधवर याला ताब्यात घेतले. त्याला रात्री सांगलीत आणण्यात आले. बुधवारी त्याला प्रभारी प्रमुख न्यायदंडाधिकारी आर. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात उभे केले असता दोन दिवस कोठडी सुनावण्यात आली. सरकारी वकील अमर रजपूत यांनी युक्तिवाद केला. प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली बँकेकडून एक कोटी 98 लाख रुपये कर्ज घेतले. प्रकल्प न उभारता पैसे स्वतःसाठी वापरले. आणखी आठ आरोपी अटक करायचे आहेत. कर्जाची रक्कम कुठे वापरली, त्याची माहिती घ्यायची आहे व ती रक्कम वसूल करायची आहे, यासाजी नऊ दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. तपास अधिकारी सुधीर भालेराव यांनी न्यायालयात हजर राहून बाजू मांडली. पण न्यायालयाने जाधवर याला दोन दिवसाची कोठडी सुनावली.
संशयित जाधवर याच्या चौकशीसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जाधवर याने या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तो खंडणीचा गुन्हा खोटा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बुधवारी जाधवर याला न्यायालयात आणले असता प्रशांत सदामतेसमर्थक व जाधवर समर्थकांची आवाराबाहेर बाचाबाची झाली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते.