

शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथे प्रेमविवाह करूनही लग्नात मानपान केला नाही आणि नवीन घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत, या कारणावरून होणाऱ्या सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जीवन संपविले. याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा शिवम पाटील असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हिने शिवम सुरेश पाटील याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यानंतर ७ जून २०२३ पासून सासरच्या मंडळींकडून पूजाचा छळ सुरू झाला. लग्नात मानपान केले नाही आणि नवीन घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणून दे, या कारणांवरून तिच्यावर शारीरिक व मानसिक दबाव आणला जात होता. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून पूजा हिने २२ सप्टेंबररोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (रा. नाथरोड, शिराळा) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती शिवम सुरेश पाटील, सासू सुमित्रा सुरेश पाटील आणि सासरे सुरेश खंडू पाटील (सर्व रा. पाडळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.