

जत : एका ३० वर्षीय विवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. जत तालुक्यातील कंठी गावालगत असलेल्या मोठेवाडी येथील खरात वस्तीवर रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे मृताचे नाव आहे. प्रेमसंबंधातून तसेच भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकरानेच ही हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
पोलिसांनी मुख्य संशयित मनोज हिम्मतराव कोळेकर (वय ३२, रा. कंठी) आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. राजाक्का यांचे माहेर जत तालुक्यातील बागेवाडी येथील असून, आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह कंठी येथील नातेवाईक काशीराम खरात यांच्याशी झाला होता. त्यांचे आई-वडीलही कंठी येथेच वास्तव्यास आहेत. राजाक्का या उच्चशिक्षित असून, पुणे येथील एका खासगी शिक्षण संस्थेत काम करण्याबरोबरच खासगी क्लासेसही घेत असल्याची माहिती आहे.
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या सुमारे दहा दिवसांपूर्वी गावी आल्या होत्या. त्यांचे कंठी परिसरातील एका तरुणासोबत पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती प्राथमिक पोलिस तपासात समोर आली आहे. रविवारी संबंधित तरुणाने राजाक्का यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी फोनला प्रतिसाद न दिल्याने संतप्त झालेला संशयित मनोज हिम्मतराव कोळेकर हा साथीदारासह थेट खरात यांच्या घरी पोहोचला. तेथे त्याने राजाक्का यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यांच्या पोटासह शरीराच्या अन्य भागांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यातील एक वार हृदयाजवळ वर्मी लागल्याने त्या गंभीर जखमी होऊन जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
उसाच्या फडात लपले
मुख्य संशयित मनोज कोळेकर आणि त्याचा साथीदार हे दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. राजाक्का यांनी भेटण्यास नकार दिला तसेच वारंवार फोन करूनही प्रतिसाद दिला नाही, याचा राग मनोज याला होता. शिवाय राजाक्का यांचे अन्य कोणासोबत संबंध असल्याचा संशयही त्याला होता. या कारणांवरून संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. हत्या केल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी जवळील कॅनॉल परिसरातील उसाच्या फडात जाऊन लपून बसले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.