Sangli Ganeshotsav : सांगली गणेशमय...

चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी झुंबड; रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये उत्साह; वाहतुकीची कोंडी
Sangli Ganeshotsav
Sangli Ganeshotsav
Published on
Updated on

सांगली : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच सांगली शहरातील बाजारपेठा रविवारी अक्षरशः फुलून गेल्या होत्या. सकाळपासून सुरू झालेली खरेदीची लगबग रात्री उशिरापर्यंत कायम होती. गणेशमूर्तींपासून सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, फुले, हार, दुर्वा तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. हरभट रोड, मारुती रोड, कापड पेठ, गणपती रोड, टिळक चौक, पंचमुखी मारुती रोड, मुख्य बस स्थानक परिसर, सांगली-मिरज रोड, विश्रामबाग चौक यांसह परिसरातील बाजारपेठांमध्ये दिवसभर खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली.

सजावटीच्या वस्तूंना मागणी

गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्याकडे नागरिकांचा कल असल्याने यंदा विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. रंगीबेरंगी फुले, तोरणे, मखर, लायटिंगच्‍या फुलांच्या माळा तसेच विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. लहान मुलांसह कुटुंबीयांनी स्टॉलवर गर्दी करत वस्तूंची खरेदी केली.

बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता

घरगुती गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक पूजेचे साहित्य घेण्यासाठीही नागरिकांची लगबग दिसून आली. फुले, हार, दुर्वा, नारळ, पूजेचे साहित्य यांसह गणरायाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रविवारी बाजारपेठ गाठली. अनेक कुटुंबांनी एकत्रितपणे खरेदी करत उत्सवाची तयारी पूर्ण केली.लहान मुलांचा उत्साह तर वेगळाच दिसत होता. आकर्षक सजावटीच्या वस्तू आणि गणेशमूर्ती पाहताना मुलांची कुतूहलपूर्ण नजर, तर आपल्या पसंतीच्या वस्तू घेण्यासाठी पालकांची लगबग दिसत होती. गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या शहरात आता आज, सोमवारी ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’च्या जयघोषात मंगलमय वातावरणात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

रात्रीपर्यंत बाजारपेठ फुल्ल

सकाळपासून सुरू झालेली गर्दी दुपारनंतर आणखी वाढली. सायंकाळच्या सुमारास प्रमुख बाजारपेठांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र होते. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची खरेदी सुरू होती. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये दिवसभर उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

फळांना मागणी वाढली

हरितालिकेच्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर रविवारी फळांच्या खरेदीसाठीही बाजारपेठेत मोठी गर्दी होती. उपवासासाठी केळी, सफरचंद, डाळिंब, चिकू, सीताफळ, पेरू यांसह विविध फळांना मागणी वाढली. गणेशोत्सवाची खरेदी आणि हरितालिकेच्या उपवासासाठी फळांची खरेदी यामुळे फळ बाजारात दिवसभर लगबग पाहायला मिळाली. ग्राहकांच्या गर्दीमुळे फळ विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news