Sangli Bedana Scam : चिनी बेदाण्याची घुसखोरी; सांगली ‌‘ब्रँड‌’ची कोंडी

बागायतदार हतबल : लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात
Bedana
अफगाणी बेदाणा
Published on
Updated on

शशिकांत शिंदे

सांगली ः जागतिक बाजारपेठेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या आणि भौगोलिक मानांकन मिळालेल्या सांगलीच्या बेदाण्याला आता आंतरराष्ट्रीय तस्करांचा आणि काही नफेखोर व्यापाऱ्यांचा विळखा बसू लागला आहे. अफगाणिस्तानमार्गेे भारतात घुसणारा चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा सांगलीचा म्हणून बाजारात खपवण्याचा मोठा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. या सर्व प्रकाराबाबत राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, अधिकारी फारसे गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सांगलीचा हक्काचा ब्रँड बदनाम होण्याचा आणि स्थानिक द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादन कमी झाल्याने साहजिकच बेदाण्याचे उत्पादनही घटले आहे. बाजारात आवक कमी असल्याने सध्या सांगलीच्या दर्जेदार बेदाण्याला चांगला दर मिळत आहे. याच वाढलेल्या दराचा फायदा उठवण्यासाठी काही स्थानिक आणि परराज्यांतील व्यापाऱ्यांनी स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचा परदेशी बेदाणा आयात करून तो सांगलीचा ब्रँड म्हणून विकण्याचा घाट घातला आहे.

नुकतेच कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथील एका बेदाणा शेडवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे 20 टन संशयास्पद बेदाणा पकडला. हा बेदाणा अफगाणिस्तानच्या बॉक्समधून आला असला, तरी प्रत्यक्षात तो चीनमधून बेकायदेशीरपणे आणलेला निकृष्ट दर्जाचा बेदाणा असल्याचे तपासात समोर आले. यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाने हा साठा जप्त केला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारे सुमारे 100 ते 200 टन चिनी बेदाणा आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दोषी व्यापाऱ्यांचे धाडस वाढले असून, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस तपासणी न झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news