

सांगली : सांगली बाजार समितीचे विभाजन लवकरच होईल, व्यापाऱ्यांचे इतर प्रश्नही सोडवण्यात येतील, असे आश्वासन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापारी शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे मांडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व व्यापारी संघटनांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी पणनमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे बैठक झाली. त्यावेळी त्यांची देसाई व शहा यांनी भेट घेतली असता त्यांनी आश्वासन दिले.
दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, नवीन गोयल, ‘फॅम’चे सचिव प्रीतेश शहा, ‘ग्रोमा’चे अध्यक्ष भीमजी भानुशाली, ‘कॅमेटे’चे अध्यक्ष दीपेन अगरवाल, भुसार अडत व्यापार संघ सोलापूरचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी आदीसह महाराष्ट्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत अध्यक्ष देसाई म्हणाले, बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे मांडण्यात आलेल्या महत्त्वाच्या 6 विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये मंत्री रावल यांनी सर्व जिल्ह्यांच्या बाजार समित्यांमधील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यामधील महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने मांडलेल्या महत्त्वाच्या 4 विषयांबाबत सकारात्क निर्णय घेण्याचे ठरले. लवकरच पुन्हा एकदा मीटिंग घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिलेले आहे.