

आटपाडी : तालुक्यातील भिवघाट - पंढरपूर रस्त्यावर मानेवाडीजवळ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात करगणी (ता. आटपाडी) येथील रिहान जमीर मुल्ला (वय 16) हा जागीच ठार झाला, तर चालकासह चारजण गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली.
कार (एमएच 14, डीएफ 9009) ही खरसुंडीहून नेलकरंजीमार्गे करगणीकडे जात होती. शनिवारी रात्री कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मेटकरवाडी बसस्थानकाजवळील दुकान गाळ्यांच्या भिंतीजवळ गाडी आदळली. दरम्यान, हा धक्का एवढा प्रचंड होता की कारने उड्डाण घेत सुमारे 200 फूट अंतर बाजूच्या रानातील खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. या भीषण अपघातात गाडीत मागील सीटवर बसलेला रिहान जमीर मुल्ला (16, रा. करगणी ) याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चौघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही पाचही मुले रात्री 10 च्या सुमारास करगणीहून खरसुंडीला कारचे कूलंट भरून आणण्यासाठी गेली होती. त्यानंतर त्यांनी तेथे जेवण केले आणि मध्यरात्रीनंतर खरसुंडीतून परत येऊ लागले. मेटकरवाडीजवळ येताच वेगाचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेत रिहानचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी घरी पोहोचली. अपघातानंतरची दृश्ये पाहण्यास लोकांची गर्दी झाली होती. या घटनेत रिहानच्या मृत्यूने करगणी गावात हळहळ व्यक्त केली जात असून कोवळ्या वयातच रिहानच्या झालेल्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली होती.