Sangli News : मणेराजुरीच्या तत्कालीन ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखली

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचे आदेश
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे रमाई घरकुल आवास योजनेत बनावट कागदपत्रे सादर करून लाभार्थी व तत्कालीन ग्रामसेवक यांनी शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी तत्कालीन ग्रामसेवकाची एक वेतनवाढ रोखण्याचे व घरकुल लाभार्थीवर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.

मणेराजुरीचे तत्कालीन ग्रामसेवक व सध्या भाळवणी (ता. खानापूर) येथे कार्यरत असलेले महादेव विठ्ठल जाधव व घरकुल लाभार्थी लालासाहेब जगन्नाथ भिसे यांच्यावर कारवाईचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

मणेराजुरी हद्दीतील घर क्रमांक 1697 ही मिळकत भाऊ भिसे यांच्या मालकीची आहे. भिसे हे कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक असल्याची संधी साधून लाभार्थी लालासाहेब भिसे यांनी त्यांच्या घर क्रमांक 5415 च्या बनावट कागदपत्रांचा वापर करून रमाई आवास योजनेतून घरकुल मंजूर करून घेतले. यासाठी लाभार्थी यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. ग्रामसेवक जाधव यांनी कागदपत्रे पडताळणी न करता बनावट स्थळ पाहणी केली असल्याचा अहवाल सादर करून घरकुलासाठी मंजुरी घेऊन लालासाहेब भिसे याला घर बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता दिला. मात्र या बोगस घटनेची माहिती भाऊ भिसे यांना होताच त्यांचा मुलगा विश्वास भिसे यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली.

मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर चौकशीत हा बोगस प्रकार समोर आला. यावर तातडीने कार्यवाही करीत ग्रामपंचायतीने लालासाहेब भिसे याला घर बांधकामासाठी दिलेल्या पहिल्या हप्त्याची रक्कम माघारी घेतली. विश्वास भिसे यांनी पाठपुरावा केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनी ग्रामसेवक महादेव जाधव यांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले.

दै. ‌‘पुढारी‌’चा पाठपुरावा

याप्रकरणी दै ‌‘पुढारी‌’ने दि. 17 जुलै 2024 रोजी प्रथम बातमी प्रसिद्ध करून रमाई घरकुल आवास योजनेतील बोगसगिरी उजेडात आणली होती. दै. पुढारी च्या दणक्याने प्रशासन गतिमान होऊन ग्रामसेवक महादेव जाधव व बोगस लाभार्थी लालासाहेब भिसे याच्यावर कारवाई झाली. त्यामुळे शासनाची होणारी फसवणूक टळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news