

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे ग्राइंडरच्या साह्याने लोखंडी सळई कापत असताना तीव्र विजेचा धक्का बसल्याने एका २० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. त्याला सुरक्षेचे कोणतेही साहित्य न पुरविल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
असलम कलंदर मुल्ला (वय २०, रा. बेडग, ता. मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजेश आनंदराव पाटील (वय ३६, रा. अभयनगर, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, असलम मुल्ला हा मंगळवारी (दि. १७) दुपारी एरंडोली येथील इरिगेशन टँक परिसरात ग्राइंडरच्या साह्याने लोखंडी सळई कापण्याचे काम करीत होता. काम करत असताना त्याला अचानक तीव्र विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना मयत असलम मुल्ला याला सुरक्षेची कोणतीही साधने किंवा साहित्य पुरवण्यात आले नव्हते. सुरक्षेच्या या गंभीर अभावामुळेच ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्याने, या प्रकरणी ठेकेदार राजेश आनंदराव पाटील याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.