

सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरातील शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल व्हाईट हाऊसच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. निखिल रवींद्र साबळे (वय 25, रा. पालवी हॉटेलजवळ, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. खुनानंतर संशयित मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार (रा. सांगली) हा दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक त्याच्या मागावर रवाना करण्यात आले आहे. आर्थिक वाद किंवा अन्य कारणातून हा खून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, निखिल साबळे हा विवाहित असून, पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते. काही दिवसांपूर्वी तो पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता. आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह तो पालवी हॉटेलजवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता. संशयित प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती. प्रसाद सुतार याचा शंभरफुटी रस्त्यावर हॉटेल व्हाईट हाऊससमोरच ओंकार सर्व्हिसिंग सेंटर नावाने वाहने धुण्याचा व्यवसाय आहे.
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास निखिल आणि प्रसाद हे दोघेही ‘व्हाईट हाऊस’च्या पहिल्या मजल्यावरील बारमध्ये दारू पिण्यास आले होते. बारमध्ये दोघांशिवाय कोणी ग्राहक नव्हते. दोघांनी कोपर्यातील टेबलसमोर दारू पिण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्यांच्यात वाद झाला. तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला एका बाजूला दातरे असलेला चाकू बाहेर काढला आणि निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला. गळ्यावर खोलवर वर्मी वार झाल्यामुळे रक्तस्राव होऊन निखिल जागीच मृत झाला. खुनानंतर प्रसाद चाकू घटनास्थळीच टाकून दुचाकीवरून पसार झाला. खुनाच्या घटनेनंतर बारमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्लेखोराच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, खुनानंतर अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
प्रसाद याने निखिल याच्या मानेवर दातरे असलेल्या चाकूने एकच वार केला. चाकूला दातरे असल्याने एकाच वाराने निखिल याच्या मानेतील मांस बाहेर आले व जागीच त्याचा मृत्यू झाला.