

मिरज : सोने देण्याचे आमिष दाखवून एकाची २ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका संशयितास मिरज ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली. शशिकांत सिद्धू पवार (रा. आरोग्य, ता. मिरज) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ८३ हजार रुपयांची रोकड आणि १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कवठेमहांकाळ येथील अण्णासाहेब उत्तम जाधव यांना संशयित शशिकांत पवार याच्यासह त्याच्या चार साथीदारांनी ‘आमच्याकडे तीन तोळे सोने आहे, ते गहाण ठेवून आम्हाला दोन लाख रुपयांचे कर्ज द्या’, असे सांगून जाळ्यात ओढले. अण्णासाहेब जाधव यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, संशयितांनी त्यांना व्यवहार करण्यासाठी आरग (ता. मिरज) येथे बोलावून घेतले.
अण्णासाहेब जाधव आरग येथे पोहोचल्यानंतर संशयितांनी त्यांच्याकडून २ लाख रुपयांची रोकड आणि २२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज शिताफीने लांबवला व तेथून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अण्णासाहेब जाधव यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक प्रकरणाचा तपास करत होते. तपासादरम्यान, हा गुन्हा आरोग्यातील शशिकांत पवार व त्याच्या साथीदारांनीच केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शशिकांत पवार याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून ८३ हजार रुपयांची रोकड व १५ हजार रुपयांचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्यातील उर्वरित फरारींचा पोलिस शोध घेत आहेत.