Sangli News : माळवाडीतील मुलींच्या वसतिगृहाची चौकशी सुरू

विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलण्याचा केला प्रयत्न; जिल्हा परिषदेकडून गंभीर दखल, १३८ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
Sangli News
माळवाडी : येथील शिक्षण संस्थेची चौकशी करताना शिक्षणाधिकारी.
Published on
Updated on

पलूस : माळवाडी (ता. पलूस) येथील सन्मान शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती ज्ञानेश्वर घाटगे हिने फिनेल प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेची जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. संबंधित वसतिगृह अनधिकृत असल्याची बाब, विद्यार्थिनीला झालेली कथित मारहाण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि कर्मचाऱ्यांची भूमिका या सर्व बाबींची सध्या सखोल चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी २४ ऑगस्ट रोजी शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी वैभव सराटे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे आणि केंद्रप्रमुख सुसीमा थोरात यांच्यावर चौकशीची संयुक्त जबाबदारी सोपवली होती. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

चौकशी दरम्यान काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास एका लहान विद्यार्थिनीने ब्रश केला नसल्याच्या कारणावरून शिक्षक सूरज पाटील यांनी संस्कृतीला कथित मारहाण केली होती. तसेच तिचे डोके भिंतीवर आपटल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना काठीने अथवा हाताने मारहाण केली जात असल्याचे काही विद्यार्थ्यांनी चौकशीत सांगितले. मात्र, या सर्व आरोपांची सीसीटीव्हीच्या आधारे पडताळणी करण्याचे काम अद्याप बाकी आहे. वसतिगृहात पहिली ते बारावीपर्यंतचे एकूण १३८ विद्यार्थी राहत असून, यात १०८ मुले व ३० मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ३० मुली वसतिगृहात राहत असतानाही तेथे सध्या एकही महिला रेक्टर (गृहप्रमुख) कार्यरत नसल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी संस्कृतीने फिनेल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. तिला तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी आष्टा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची भिलवडी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

त्यानंतर २ सप्टेंबर रोजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माळवाडी येथे जाऊन दिवसभर सखोल चौकशी केली. या वेळी सीसीटीव्ही फुटेज, विद्यार्थ्यांचे जबाब आणि वसतिगृहातील सोयी-सुविधांची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, या चौकशीबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अथवा वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news