सांगलीला सारे मिळून ‘स्मार्ट सिटी’ बनवा : रवींद्र चव्हाण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश
Sangli News
Published on
Updated on

सांगली ः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी बनवा. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाठबळ देतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला.

यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आले आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांचे काम लक्षवेधी राहिले आहे. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला आहे. त्यांचे नक्की भले होईल. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत. ते मनाने कधीच भाजपचे झाले होते, आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे.

जयकुमार गोरे म्हणाले, युद्धात, राजकारणात वेळ चुकून चालत नाही. बाबा, देर आए, दुरुस्त आए. तुमची पंचसूत्री पूर्ण करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नव्हती, ती भाजपात आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, मी विधानसभेच्या दोन निवडणुका एक व्हिजन घेऊन लढवल्या. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. विकासाची पंचसूत्री मी तयार केली होती. ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. सांगलीला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी थेट चांदोलीतून पाणी द्यावे; अ‍ॅग्रोटेक हब म्हणून सांगलीचा विकास करण्यासाठी कवलापूर विमानतळाला मान्यता द्यावी; पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कृष्णाकाठचा विकास व सीटी पार्कच्या जागेवर विकास करावा; विस्तारीत सांगलीचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, अशी मागणी केली आहे. हे सारे सुधीरदादांच्या साथीने करायचं आहे. भाजपकडे विकासाची दृष्टी आणि मजबूत धोरण असल्याने मी भाजपात आलो आहे. यावेळी आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, प्रवीण दरेकर, पृथ्वीराज देशमुख, समित कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसाठी आग्रह.. नाराजी नाट्य

सिंगापूरचे उपपंतप्रधान मुंबईत आल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जावे लागणार आहे. त्यामुळे ते भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेशाला उपस्थित राहू शकत नाहीत, असा निरोप प्रदेश कार्यालयात आला. मात्र फडणवीस यांच्याहस्तेच प्रवेश व्हावा, यासाठी पृथ्वीराज पाटील व समर्थक आग्रही होते. यामुळे चंद्रकांत पाटील पृथ्वीराज पाटील यांना घेऊन सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. तिथेच फडणवीस यांनी स्वागत केले. यादरम्यान घडलेल्या नाराजी नाट्याची चर्चा सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news