Mahankali Sugar Factory: ‘महांकाली’च्या निर्णायक लढाईचा आज फैसला!

आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन अन् प्रतिष्ठेच्या लढाईनंतर विजयाची उत्सुकता
Mahankali Sugar Factory
Mahankali Sugar Factory
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेला राजकीय आखाडा आता निर्णायक वळणावर आला आहे. गावोगावी झालेल्या बैठका, सभासदांच्या गाठीभेटी, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि सोशल मीडियावरील घमासानानंतर उद्या (बुधवार, दि. ९ सप्टेंबर) तहसीलदार कार्यालय, कवठेमहांकाळ येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती जाणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दि. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानात सहा गटांतील एकूण १३ हजार ४३६ मतदारांपैकी ४ हजार ६७ मृत मतदार वगळल्यानंतर ९ हजार ३६९ पात्र सभासद मतदानासाठी पात्र होते. त्यांपैकी तब्बल ७ हजार ३७१ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत ५४.८६ टक्के, तर पात्र सभासदांच्या तुलनेत तब्बल ७८.६७ टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या निवडणुकीत प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय वातावरण तापले. सभासदांच्या बैठका, गावपातळीवरील रणनीती, एकमेकांवर केलेले आरोप आणि त्यांना दिलेली प्रत्युत्तरे यांमुळे महांकालीची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. विशेषतः सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोपांनी रंगत आणखी वाढवली. आता मात्र भाषणांचा आवाज थांबला असून मतपेटीतूनच अंतिम उत्तर उद्या मिळणार आहे.

कुची गटात सर्वाधिक मतदान; रांजणीत सर्वात कमी

सहा गटांमध्ये कुची गटाने सर्वाधिक ८४.८४ टक्के मतदानाची नोंद केली. या गटातील १ हजार ७०९ पात्र मतदारांपैकी १ हजार ४५० सभासदांनी मतदान केले. त्यापाठोपाठ देशिंग गटात ८०.५४ टक्के, हिंगणगाव गटात ७९.८६ टक्के, कवठेमहांकाळ गटात ७९.२६ टक्के, कर्नाटक गटात ७७.८४ टक्के, तर रांजणी गटात ७२.७९ टक्के मतदान झाले.

आरोपांच्या फैरींनंतर आता मतपेट्या उघडणार!

प्रचाराच्या काळात गावोगावी बैठकांचा धडाका सुरू होता. 'व्हॉट्सॲप' ग्रुप्सपासून ते प्रत्यक्ष सभांपर्यंत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले. थेट आरोप, त्यांना दिलेली प्रत्युत्तरे, दावे आणि प्रतिदावे यांमुळे ही निवडणूक केवळ सत्तेचीच नव्हे, तर प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news