Sangli News : घरपट्टी वाढीविरोधात महापालिकेसमोर गांधीगिरी

कृती समितीचे आंदोलन; पदाधिकारी, नगरसेवकांना निवेदन
Sangli News
घरपट्टी वाढीविरोधात महापालिकेसमोर गांधीगिरी
Published on
Updated on

सांगली : भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीतील विविध त्रुटी, कायदेशीर बाबी, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकती तसेच वाढीव घरपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेला अन्याय याकडे लक्ष वेधत वाढीव घरपट्टीविरोधी कृती समितीने सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प व मागण्यांचे निवेदन दिले.

या आंदोलनात वाढीव घरपट्टीविरोधी कृती समितीचे सतीश साखळकर, हणमंतराव पवार, नितीन मिरजकर, सुरेश टेंगले, बाळासाहेब मासुले, ओंकार माने, सुभाष तोडकर, शंभुराज काटकर, आनंद देसाई, किरणराज कांबळे, संतोष चौगुले, श्रीशैल ढोले, विजयकुमार कांबळे, अविनाश जाधव, मीरा सिंहासने, प्रसन्न कुलकर्णी, शाहीर पाटील, प्रवीण माळी, अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वाढीव घरपट्टीच्या अनुषंगाने कृती समितीने निदर्शनास आणून दिलेल्या सर्व त्रुटींचा सखोल अभ्यास करण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय समिती नेमण्यात यावी आणि यासाठी महापालिकेची विशेष महासभा बोलाविण्यात यावी. आवश्यक सुधारणा करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा. दरम्यान, वाढीव घरपट्टीविरोधात लोकशाही मार्गाने आणि गांधीगिरीच्या माध्यमातून नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news