

शशिकांत शिंदे
सांगली : गेलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आक्रमक पवित्र्यात असलेली महाविकास आघाडी यावेळी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मात्र बचावात्मक पवित्र्यात आहे. याउलट महायुतीचे नेते जोरदार प्रयत्न करत असून सत्तेसाठी त्यांच्यातच फूट पडून अटीतटीची लढत दिसत आहे.
महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप तब्बल पाच ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे. महायुतीतील घटकपक्षांत फूट पडली आहे. जत, विटा, तासगाव आणि पलूस नगरपरिषद, तर आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. महायुतीचे एकनाथ शिंदे यांची शिवसेना विटा नगरपालिकेसह आटपाडी आणि शिराळा नगरपंचायत निवडणूक लढवित आहे, तर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस इस्लामपूर, आष्टा आणि पलूस नगरपालिका लढवित आहे.
एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा चांगलाच दबदबा होता या निवडणुकीत तो ओसरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता, ही निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची मानली जात होती. मात्र विटा, आटपाडी आणि पलूस या महत्त्वाच्या तीन ठिकाणी महायुतीतील घटकपक्षांमध्येच झालेली फूट भाजपला मोठे आव्हान ठरत आहे. स्थानिक राजकारणातील दीर्घकाळ चालत आलेले मतभेद, नेत्यांतील अंतर्विरोध आणि उमेदवारी निवडीवरील नाराजी यामुळे ही अवस्था निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.
गत काही वर्षांत सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळेच भाजप पाच ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उभा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर या निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी असून त्यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. मात्र विटा, आटपाडी व पलूसमधील अंतर्गत फूट, उमेदवारीवरील असंतोष, काही वरिष्ठ नेत्यांची नाराजी आणि महायुतीतील विसंवाद या सर्व गोष्टी भाजपसमोर मोठे आव्हान बनल्या आहेत. प्रचार व स्थानिक समीकरणे हेच निकालाचे भविष्य ठरवतील, असे चित्र दिसते.