

सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा व दोन नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी व थेट नगराध्यक्ष पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मंगळवार, दि. 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तीन वर्षांच्या खंडानंतर या निवडणुका होत असल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, विशेषत: नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढली आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत आणि पलूस या सहा नगरपरिषदा व शिराळा आणि आटपाडी अशा दोन नगरपंचायती, अशा एकूण आठ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मंगळवारी जाहीर झाली.
या आठही ठिकाणी थेट अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 17 नोव्हेंबरअखेर आहे. 18 नोव्हेंबररोजी अर्जांची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारांना 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 2 डिसेंबररोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहे. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबररोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता स्थगित करण्यात येणार आहे.
इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत आणि पलूस नगरपरिषदेची आणि शिराळा नगरपंचायतीची मुदत डिसेंबर 2022 मध्ये संपली आहे. आटपाडी नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. शिराळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद खुले असून आटपाडीत नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण आहे. नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक होत असल्यामुळे चुरस वाढली आहे. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.