

आटपाडी : लिंगीवरे (ता. आटपाडी) येथे ग्रामसभा सुरू असताना गल्लीतील गटाराच्या कामाबाबत प्रश्न विचारल्याच्या रागातून तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच कपडे फाडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गावातील हनुमान मंदिरासमोर घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात १० जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अजय रामचंद्र गवळी (वय २९, रा. लिंगीवरे) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल रावसाहेब झिंबल, अमोल नंदकुमार झिंबल, अंकुश सुखदेव खांडेकर, समाधान अरुण खटके, यश जनार्दन झिंबल, सुभाष धुळा झिंबल, पार्थ सुभाष झिंबल, विकास भानुदास खटके, अतुल नंदकुमार झिंबल व आनंदा सुखदेव खांडेकर (सर्व रा. लिंगीवरे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंगीवरे येथील ग्रामसभेत फिर्यादी अजय गवळी यांनी आपल्या गल्लीत दोन्ही बाजूंना गटार मंजूर असताना रस्त्याच्या मध्यभागी एकच गटार का घेतले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. याचा राग धरून संशयितांनी अजय यांना हनुमान मंदिराबाहेर ओढून नेले. तेथे त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत कपडे फाडले व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ‘तुला गावात राहू देत नाही, तुला बघून घेतो’, अशी धमकीही त्यांनी दिली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.