

येडेनिपाणी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येडेनिपाणी (ता. वाळवा) फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मृत बिबट्या मादी जातीचा असून तिचे वय अंदाजे तीन ते चार वर्षे असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
येडेनिपाणी फाट्याजवळ एका धाब्यासमोर रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने बिबट्याला धडक दिली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धडकेनंतर वाहनचालक न थांबता निघून गेला. महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनधारकांच्या ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महामार्गालगत डोंगर, दाट झाडी आणि उसाची शेती असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावर मोठा आहे. यापूर्वीही याच परिसरात वाहनांच्या धडकेत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.