

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे शेतातून परत येत असलेल्या जीवन भोसले या तरुणाच्या दुचाकीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने डाव्या बाजूने जीवन यांच्या पायाला पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांची पँट फाटली. प्रसंगावधान राखत दुचाकीवर नियंत्रण मिळवून पुढे गेल्याने जीवन बचावले. ही घटना शनिवार, दि. 18 रोजी सायंकाळी सात वाजता ताकारी योजनेच्या पोटपाटावरील अरुंद रस्त्यावर घडली.
सोनहिरा खोर्यात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत; मात्र माणसांवर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जीवन भोसले हे शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास शेतातील कामे उरकून दुचाकीवरून अभयारण्यालगत असलेल्या ताकारी योजनेच्या पोटपाटावरील अरुंद रस्त्याने घरी निघाले होते. त्यांच्यासमोर एक दुचाकी जात होती. यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्या समोरील दुचाकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या चालकाने दुचाकी वेगाने पुढे पळवली. याचवेळी जीवन यांची दुचाकी बिबट्याजवळ आली. त्यामुळे बिबट्याने यांच्याकडे झेपावत त्यांचा डावा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीतही जीवन यांनी नियंत्रण मिळवत दुचाकी पुढे पळवल्याने अनर्थ टळला. घटनेनंतर कडेगाव प्रादेशिक वन विभाग व सागरेश्वर अभयारण्यातील अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला.