Sangli Legislative Council election: भाजप विरुद्ध सर्वपक्षीय पॅटर्न रंगणार

सातारा जिल्हा परिषदेतील फोडाफोडीच्या राजकारणाचा हिशेब चुकता होणार?
Legislative Council Election
Legislative Council Electionpudhari photo
Published on
Updated on
शशिकांत शिंदे

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते, माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक मोहनराव कदम या मतदारसंघातून विजयी झाले होते.

यंदाच्या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील मतदारांचे आणि राजकीय समीकरणांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. राज्यात आणि केंद्रात जरी महायुतीची सत्ता असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र प्रचंड अंतर्गत धुसफूस आणि कुरघोड्यांचे राजकारण उफाळून आले आहे. भाजप विरोधात सर्वपक्षीय उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे तीनही पक्ष काही ठिकाणी एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे ठाकले होते. सातारा जिल्हा परिषदेत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील सदस्य फोडल्याने युतीमधील दरी वाढली.

दुसरीकडे, सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वच विरोधकांनी एकत्र येत महाविकास आघाडीचा सांगली पॅटर्न राबवला आणि भाजपला मोठा धक्का दिला. सातारा जिल्हा परिषदेतही पदाधिकारी निवडीवेळी मोठा हायव्होल्टेज ड्रामा घडला होता. थेट पोलिस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी झाली आणि पुढे त्यांची बदलीही करण्यात आली. या घडामोडींनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील जाहीर सभेत ‌‘योग्य वेळी याचे कृतीतून उत्तर देऊ‌’, असा थेट इशारा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत त्या इशाऱ्याचा प्रत्यय येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगली बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता असताना, संचालक मंडळ बरखास्त करून त्रिभाजनाच्या नावाखाली तिथे प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी आणि मोर्चेबांधणी वेगाने सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड हे निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. ते आमदार विश्वजित कदम यांचे नातेवाईक असून, कदम स्वतः लाड यांच्यासाठी सांगली आणि साताऱ्यात तगडी फिल्डिंग लावत आहेत. जिल्हा बँकेचे दुसरे संचालक तानाजीराव पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून शड्डू ठोकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news